पुणे; वर्दळीच्या बाजीराव रस्त्यावर अपघात, तरुणाचा जागीच मृत्यू - पुणे अपघात
पायी चाललेला तरुण अचानक मिक्सरच्या खाली कसा सापडला हे पोलिसांना लक्षात आलेले नाही. मात्र, त्याच्या हातामध्ये मोबाईल असल्यामुळे तो बोलत त्याच्या खाली सापडला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तो नेमका या परिसरात कशासाठी आला होता. याप्रकरणी तपास सुरू आहे.
पुणे- वर्दळीच्या बाजीराव रस्त्यावर मंगळवारी सायंकाळी एका ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका पादचारी तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. पवन संजय गिते (वय २५, रा. खराडी) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. मृत्यू झालेला तरुण मोबाईलवर बोलत असताना अचानक मिक्सरच्या खाली गेला असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या तरुणाच्या हातात मोबाईल देखील मिळून आला आहे. संक्रातीच्या खरेदीसाठी तुळशीबाग, शनिपार परिसरात महिलांची झुंबड उडाली असतानाच हा अपघात झाला. याप्रकरणी संबंधित टेम्पो, मिक्सर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय टिकोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाजीराव रस्त्यावरून पवन हा पायी चालत शनिवारवाड्याकडे निघाला होता. विश्रामबागवाड्यासमोर एका टेम्पो व पाठीमागे असलेल्या मिक्सर खाली पवन आला. त्याच्या डोक्यावरून मिक्सर गेल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास गर्दीच्या वेळी हा अपघात घडल्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पायी चाललेला तरुण अचानक मिक्सरच्या खाली कसा सापडला हे पोलिसांना लक्षात आलेले नाही. मात्र, त्याच्या हातामध्ये मोबाईल असल्यामुळे तो बोलत त्याच्या खाली सापडला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तो नेमका या परिसरात कशासाठी आला होता. याप्रकरणी तपास सुरू आहे.