पुणे:पुणे पोलीस आणि एटीएसने दोन दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर दहशतवादी कारवायांमधे सहभाग असलेल्या लोकांना अटक करण्याची संख्या वाढत आहे. दहशतवादी कारवायांप्रकरणी एटीएस कडून रत्नागिरी मधून आणखी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. दहशतवाद्यांना आश्रय देण्याबरोबरच या आरोपींना आर्थिक रसद पुरवल्याचा आरोप या संशयितांवर आहे.
रत्नागिरीतून एकाला अटक केल्यानंतर आतापर्यंत एकूण 4 संशयित आरोपींना अटक झाली आहे. यात पुण्याच्या मिठानगर कोंढवा भागातील ए १ बिल्डींग फ्लॅट नं. १७ येथील रहिवासी मोहम्मद इम्रान मोहम्मद युसुफ खान वय २३ वर्ष तसेच मोहम्मद युनुस मोहम्मद याकुब साकी वय २४ वर्षे, रा. ए/१, बिल्डींग फ्लॅट नं. १७, चेतना गार्डन, मिठानगर, कोंढवा, पुणे दोघेही मूळ रा. रतलाम मध्यप्रदेश अशी या संशयित दहशतवाद्यांची नावे आहेत.
दहशतवादी कृत्यांमधे सहभाग आणि दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांवर एटीएसने जोरदार मोहिम उघडली असून आणखी तपास सुरू आहे. पुण्यात राहत असलेल्या दोन अतिरेक्यांना आणि त्यांच्यासोबत पळून गेलेल्या एकाला रात्री पुण्यात आल्यानंतर आश्रय देण्यासाठी या आरोपीने मदत केल्याची माहिती आहे. त्याची पोलीस कोठडी सुद्धा घेण्यात आलेली आहे. या दोन दहशतवाद्यांना आर्थिक मदत करणाऱ्या आरोपीचा शोध घेऊन त्याला रत्नागिरीमध्ये पकडण्यात आले. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करून त्याची पोलीस कोठडी घेण्यात आलेली आहे.
याबाबत आणखी एका संशयित आरोपीला पकडण्यासाठी राज्यात पथक गेल्याची माहिती देण्यात आली आहे. तपासात त्याचा गुन्हा निष्पन्न झालेला आहे. तपासाबाबत गोपनीयता बाळगण्याच्या दृष्टीने एटीएसने त्या व्यक्तीचे नाव जाहीर केलेले नाही. तसेच तपासकामासाठी परराज्यात गेलेल्या पोलीस पथकाने एका संशयिताला चौकशीसाठी हजर राहणेबाबत नोटीस बजावली आहे. तो आल्यानंतर गुन्हयातील सहभागाबाबत चौकशी करण्यात येणार आहे. सर्व अटक आरोपींचा, त्यांच्या फरार झालेल्या साथीदाराचा, गुन्हयातील अटक आरोपींना फरार कालावधीत सहाय्य करणाऱ्या लोकांचा तपास दहशतवादविरोधी पथकाकडील विविध पथके करत आहेत.