पिंपरी-चिंचवड (पुणे) - सिग्नल ओलांडणाऱ्या दुचाकीस्वाराला एका कारने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली असून दुपारी उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू झाला आहे. किरण संदीप नखाते (वय 17, रा. दत्तनगर, वाकड) असे मृत्यू झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत किरण नखाते सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास डांगे चौकातून ताथवडेच्या दिशेने दुचाकीवरून जात होता. शहरातील डांगे चौकातील सिग्नल ओलांडून ताथवडेच्या दिशेने जात असताना भरधाव वेगात आलेल्या एका प्रवासी कारने किरणच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात किरण गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ उपचारासाठी नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याचा दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघात घडल्यानंतर कार चालक कार घेऊन पासर झाला आहे. घटनेचा अधिक तपास वाकड पोलीस करत आहेत.