पुणे-फरासखाना पोलिसांनी ऑगस्ट महिन्यात शहर आणि जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार केले असतानाही पुणे शहरात पिस्तूल घेऊन खुलेआम फिरणाऱ्या सराईत गुंडाला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे. जयेश विजय लोखंडे (20) रा. मंगळवार पेठ, असे या अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
शहरात खुलेआम पिस्तुल घेऊन फिरणारा सराईत गुन्हेगार जेरबंद - पुणे सराईत गुन्हेगार अटक
दोन वर्षासाठी तडीपार केले असतानाही पुणे शहरात पिस्तूल घेऊन खुलेआम फिरणाऱ्या सराईत गुंडाला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे.
![शहरात खुलेआम पिस्तुल घेऊन फिरणारा सराईत गुन्हेगार जेरबंद one criminal arrest with a pistol in pune](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-9421276-100-9421276-1604420631723.jpg)
गुन्हे शाखेच्या पोलिसांना शिवाजीनगर येथील मंगला टॉकीजच्या मागे एक व्यक्ती शस्त्रासह येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून संशयास्पद अवस्थेत उभ्या असणाऱ्या एका तरुणाला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे गावठी बनावटीचे दोन पिस्तूल आणि 4 जिवंत काडतुसे सापडली. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाणे, फरासखाना पोलीस ठाणे, समर्थ पोलीस ठाणे आणि चतु:शृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असे एकूण पाच गुन्हे दाखल आहेत. फरासखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीत त्याच्याविरोधात अवैधरित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हादेखील दाखल आहे. त्या गुन्ह्यात त्याला पुणे शहर व पुणे जिल्हातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. तडीपारी आदेशाचा भंग केल्यामुळे त्यांच्याविरोधात शिवाजी नगर पोलीस ठाण्यात भारत हत्यार कायदा कलम [ 3] 25 व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 142 37 [ 1] [ 3 ] सह 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.