भीमाशंकर (पुणे) -बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असेलेले श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर व परिसरातील पर्यटन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील एक वर्षापासून बंद असल्याने भीमाशंकर परिसरातील माकडांची व मुक्या प्राण्यांची उपासमार होत होती. अशातच मंचर शहरातील काही युवकांनी सामाजिक बांधिलकी जपत एक घास मुक्या प्राण्यांसाठी ही संकल्पना राबवली. भीमाशंकर परिसरात 1 हजार कलिंगड व 20 कॅरेट केळी माकड व मुक्या प्राण्यांना खाऊ घातली आहेत.
पक्षी व प्राणी मित्रांचा समाजाला नवा आदर्श -
सध्याच्या आधुनिक युगात माणूस माणसाला ओळखायला तयार नाही. आपल्या स्वतःच्या नात्यापेक्षा मुक्या प्राण्यांचा जीव लावला तर ते प्राणी देखील आपल्याला जीव लावतात. भगवान गौतम बुद्धांनी सांगितले आहे की, पशु व पक्षी यांना दिलेले दान सातपटीने लाभ करणारे असते. संपूर्ण जग सध्या कोरोना महामारीच्या वेढ्यात सापडले आहे. माणूस माणसाला ओळखायला तयार नाही. अशा परिस्थितीमध्ये मंचर येथील पक्षी व प्राणी मित्र एकत्र येत समाजाला नवा आदर्श घालून दिला आहे. भीमाशंकर देवस्थान परिसरामध्ये असलेल्या माकडांवर व इतर पशु पक्षांवर उपासमारीची वेळ येऊ नये. यासाठी मंचर येथील युवक वेगवेगळ्या प्रकारचे खाद्य या मुक्या प्राण्यांसाठी दररोज देत आहेत. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळातही मुक्या प्राण्यांची भूक भागत आहे.