पुणे -एकाच ट्रॅकवर आलेल्या दोन ट्रेनच्या अपघाताची घटना नुकतीच हैदराबाद येथे घडली होती. पुण्यातील लोणावळा लोहमार्गावरही असाच प्रकार घडला. मात्र, दोन्ही ट्रेन सुरक्षित अंतरावर थांबल्याने मोठी दुर्घटना टळली.
हेही वाचा -Aus vs Pak : स्मिथने मोडला ७३ वर्ष जुना विक्रम; सचिन, विराटला टाकले मागे
मळवली येथे रेल्वे रुळाला तडे गेल्याने लोकल रेल्वे आणि डेक्कन रेल्वे एकाच ट्रॅकवर आल्या. सकाळी पावणे आठच्या सुमारास झालेल्या या घटनेमुळे प्रवाशी घाबरले होते. ही घटना ऍटोमॅटिक ब्लॉग सिग्नल सिस्टमचा प्रकार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
सविस्तर माहिती अशी की, पुणे-लोणावळा लोहमार्गावर मळवली येथे रेल्वे रुळाला तडे गेल्याची घटना घडली. यामुळे लोकल रेल्वे काही सुरक्षित अंतरावर थांबवण्यात आली होती. मात्र, त्या पाठोपाठ धावणारी डेक्कन रेल्वे देखील भरधाव वेगात येऊन सुरक्षित अंतरावर थांबली. सदर घटनेमुळे गोंधळ उडाला. मात्र, पाऊण तासाने दोन्ही रेल्वे लोणावळ्याच्या दिशेने मार्गस्थ झाल्या.
चिंचवड आणि लोणावळा दरम्यान एका पेक्षा जास्त रेल्वे धावतात. प्रत्येक किलोमीटर अंतरावर सिग्नल यंत्रणा कार्यन्वित करण्यात आली आहे. त्यामुळे एका पाठोपाठ अनेक रेल्वे धावू शकतात, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. यापूर्वी दोन रेल्वेमध्ये दहा किलोमीटरचे अंतर असायचे. डेक्कन रेल्वे ही सुरक्षित अंतरावर थांबलेली होती, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.