पुणे- ग्रामपंचायतीच्या निवडणूक अर्जासाठीचा गोंधळ सुरूच असून ऑनलाइन अर्ज भरताना सर्व्हर डाऊन असल्याने 'ऑफलाईन' अर्ज प्रणाली सुरू करण्यात आली आहे. या निवडणुकींसाठी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. मात्र, अर्ज भरले जात नसल्याने इच्छुकांची धांदल उडाली आहे.
पुणे जिल्ह्यातील अनेकांचे अर्ज भरले न गेल्याने ऑफलाईन अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी झाली आहे. पुण्यात गणेश कला क्रीडा मंच येथे पहाटेपासूनच अनेक जण केंद्रावर रांगा लावून आहेत. ऑफलाईन अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची पळापळ होताना याठिकाणी दिसत असल्याचे चित्र होते. एकंदरीतच किचकट अर्ज प्रणाली असल्याने अनेकांचा हिरमोड झाला. १६ पानी अर्ज असल्याने अर्ज भरण्यासाठी वेळ कमी पडेल म्हणून मुदत वाढवून देण्याची मागणी उमेदवारांनी केली.