पुणे PM Narendra Modi : ऑक्सफर्ड ऑफ युनिव्हर्सिटी अशी ओळख असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आठ नंबर हॉस्टेलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर लिहिण्यात आल्याचं सांगितलं जातंय. या विरोधात आज भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आंदोलन केलं जाणार असल्याची माहिती भाजपाचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी दिली. तर या प्रकरणी विद्यापीठ प्रशासनानं गुन्हा दाखल करावा, अशी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं मागणी केली.
दोन दिवसांपूर्वी झाला होता वाद :दोन दिवसांपूर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये सभासद नोंदणीवरून दोन गटांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर गुरुवारी (2 नोव्हेंबर) रात्री विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर लिहिण्यात आल्याचं समोर आलं. याचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. संबधित आक्षेपार्ह मजकूर कुणी लिहिला याचा शोध विद्यापीठाकडून सुरु आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल भिंतीवर आक्षेपार्ह मजकूर लिहिल्यानं भाजपा कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं बघायला मिळतंय. या प्रकरणी डाॅ. महेश रघुनाथ दवंगे यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तक्रार दाखल करण्यात आली. त्यामुळं आता हा वाद वाढण्याची शक्यता आहे.