पुणे -देशातील स्वच्छ शहरांमध्ये पहिला क्रमांक मिळविण्यासाठी दिवसरात्र एक केलेल्या पुणे महापालिका प्रशासनाला मोठा झटका बसला आहे. स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत शहराचे स्टार रेटिंग जाहीर करण्यासाठी पालिकेस शहर हागणदारी मुक्त (ओडीएफ प्लस) असल्याचा दर्जा मिळविणे बंधनकारक होते. मात्र, या स्पर्धेत महापालिका नापास झाल्याने हे रेटिंग मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
पालिकेने या वर्षी 'ओडीएफ प्लस’ दर्जा मिळवण्यासाठी केंद्राकडे अर्ज केला होता. त्यामध्ये सुमारे 224 सर्वाधिक चांगल्या व अत्याधुनिक सुविधा असलेल्या स्वच्छता गृहाची तपासणी करण्यात आली. स्वच्छतागृहांत वेगवेगळे 53 निकष पूर्ण असणे आवश्यक होते. मात्र, अनेक ठिकाणी हे निकष पूर्ण न झाल्यामुळे पथकाने पालिकेस 'ओडीएफ प्लस’ दर्जा दिला नाही. परिणामी, महापालिकेस शहराचे स्टार रेटिंग करणे शक्य नाही. त्यामुळे पालिका आपोआपच स्वच्छ शहरांच्या स्पर्धेतून बाहेर पडणार आहे.