पुणे - कोरोनामुळे बारामती आगारातील ४ लालपऱ्या तब्बल २ महिन्याच्या दीर्घ विश्रांतीनंतर २३ मार्च रोजी रस्त्यावरुन धावल्या. ग्रामीण भागातील जनतेशी अतुट नाते असणारी लालपरी बारामती आगारातून जेजुरी, वालचंदनगर, भिगवण, एमआयडीसी या चार ठिकाणी धावली.
कोरोनाच्या पार्श्वभूमी सध्या लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात काही नियम शिथिल करण्यात आले आहेत. यामुळे, बारामती आगाराने जेजुरी, वालचंदनगर, भिगवण, एमआयडीसीसह नव्याने हडपसर आणि नीरा बस गाड्या १५ जूनपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सकाळी ६ ते रात्री ६ या वेळेत प्रत्येक तासाला बारामती आगारातून बसगाड्या सोडल्या जाणार असल्याची माहिती बारामती आगार प्रमुख अमोल गोंजारी यांनी दिली. एस.टी.बसची प्रवाशी वाहतूक क्षमता ४४ इतकी आहे. माञ, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या एका बसमधून केवळ २२ प्रवाशीच प्रवास करत आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने रस्त्यावर धावणाऱ्या या बसगाड्या सॅनिटायझरने निर्जंतुकीकरण करुन सोडल्या जात आहेत. तसेच प्रवाशांना बसमध्ये प्रवेश करण्याआधीच वाहकांकडून हातावर सँनिटाझर दिले जात आहे. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन केले जात आहे. माञ, सध्या सुरू असणाऱ्या बस गाड्यांमधून जेष्ठ नागरिकांना व १० वर्षाखालील मुलांना प्रवासाची परवानगी नाही. प्रवाशांकडून पूर्वीप्रमाणे नियमित भाडे घेतले जात आहे. तसेच प्रत्येक प्रवाशाने व एसटी कर्मचाऱ्याने हात निर्जंतुक करणे व तोंडाला मास्क लावणे आवश्यक आहे.