पुणे-राज्यात सध्या कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढताना दिसतो आहे. यात ही विदर्भात अमरावती , यवतमाळ भागात रुग्ण संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहेत. सध्या कोरोनाच्या विषाणूचा नवीन स्टेन आला असल्याची भीती व्यक्त केली जाते आहे. मात्र, याभागात आढळत असलेला कोरोना विषाणूचा नवीन स्टेन नसल्याचे समोर आले आहे. कोरोना विषाणूंचा प्रकार हा ब्रिटन, दक्षिण आफ्रिका किंवा ब्राझीलमधून आलेला नसल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात याबाबतचा अभ्यास करण्यात आला. बी. जेमधील सुक्ष्मजीव शास्त्र विभागात याबाबतच्या चाचण्या करण्यात आल्या त्यातून हा निष्कर्ष समोर आला आहे.
१२ कोरोनाच्या नमुन्यांची तपासणी
राज्यात गेल्या काही दिवसात वाढलेल्या रुग्ण संख्येमुळे कोरोना विषाणूचा नवा स्टेन असल्याची भीती व्यक्त होत होती. याबाबतचे जनुकीय विश्लेषण करण्यासाठी पुण्यातल्या बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात आभ्यास करण्यात आला. त्यामध्ये यवतमाळ, अमरावती, सातारा येथून प्रत्येकी चार असे एकूण १२ कोरोनाचे नमूने घेण्यात आले. प्रत्येकात वेगवेगळे म्युटेशन आढळून आले. मात्र, या नमून्यांमध्ये ब्रिटन, ब्राझील किंवा दक्षिण आफ्रिकेतून आलेले स्टेन नसल्याची माहिती ससूनच्या सुक्ष्मजीव शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी दिली.
राज्यात 'डी६१४जी' या प्रकारचा विषाणू
राज्यात सध्या सर्वत्र कोरोनाचा 'डी६१४जी' या प्रकारचा विषाणू आहे. तोच विषाणू पुणे, सातारा येथील नमुन्यांमध्ये आढळला. नमुन्याची तपासणी केलेल्या कोणत्याच ठिकाणी ब्रिटन, दक्षिण आफ्रिका किंवा ब्राझील येथील जनुकीय बदल झालेला विषाणू आढळून आला नाही. मात्र, अमरावती, यवतमाळ आणि सातारा या तीनही ठिकाणी थोड्याफार फरकाने वेगवेगळे बदल झाले आहेत. यवतमाळमध्ये 'एन४४०के' हा प्रकारचा विषाणू असल्याचे दिसून आले तर सातारा जिल्ह्यातील नमुन्यांमध्ये 'व्ही९११आय हा विषाणू आढळला.
जास्तीत जास्त परिक्षण करावे लागणार
यवतमाळ, अमरावती आणि सातारा या तीनही ठिकाणी विषाणूंच्या जनुकीय रचना थोड्याफार फरकाने वेगळी आहे. मात्र, यात परदेशातून नव्याने बदल झालेल्या विषाणूंचा समावेश नाही. त्यासाठी आता आणखी नमूने तपासावे लागतील. त्यात जर उत्परिवर्तन आढळून आले तर आपल्याला सतर्क रहावे लागेल, असे डॉ राजेश यांनी सांगितले. कोरोना विषाणू हा स्वतःला वाढवण्यासाठी उत्परिवर्तन करत असतो. त्यासाठी जास्त प्रमाणात परिक्षण करावे लागणार असून त्यातून उत्परिवर्तनाचा नेमका काय परिणाम होतो ते पहावे लागणार असल्याचे डॉ राजेश यांनी सांगितले.