महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोना इफेक्ट : वारीत गजबजणारे इंद्रायणीचे घाट भक्तांंविना सुने - wari update news

कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी आळंदीहून निघणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या यंदाच्या आषाढी वारीत केवळ 50 जणांनाच जाता येणार आहे. यामुळे दरवर्षी वारकऱ्यांच्या गर्दीने गजबजणारे इंद्रायणीचे घाट यंदा कोरोनामुळे भक्तांविना सुने पडले आहे.

indrayani ghat
वैष्णवांविना इंद्रायणी घाट

By

Published : Jun 13, 2020, 11:07 AM IST

Updated : Jun 13, 2020, 11:31 AM IST

(राजगुरुनगर) पुणे - संत ज्ञानेश्वर महाराजांचा आषाढी वारी सोहळा आजपासून सुरू होत असून चार वाजता संजीवन समाधी मंदिरातून पालखीचे प्रस्थान होणार आहे. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे यावर्षी अलंकापुरीत टाळ-मृदुंगाचा गजर नाही, वारकऱ्यांच्या राहुट्या नाही, अभंगाची सुरावट नाही, असा हा सुना सोहळा देवाच्या अलंकापुरीमध्ये होत आहे.

आढावा देताना प्रतिनिधी
कोरोनाच्या महामारीचे संकट जगावर असताना माऊलींचा आषाढी वारी सोहळा मोजक्या 50 लोकांमध्ये पार पडणार आहे. त्यामुळे या सोहळ्यात वारकऱ्यांनी सहभागी न होता घरातूनच आपली सेवा अर्पित करण्याचे आवाहन प्रशासन व देवस्थानाकडून करण्यात आले होते. त्यामुळे आळंदीमध्ये वारकरी येताना दिसत नसून संपूर्ण इंद्रायणी घाट हा सुनसान झाला आहे.आषाढी वारी म्हणजे वैष्णवांचा जीव की प्राण असते. आषाढीची वैष्णवजण आतुरतेने या सोहळ्याची वाट पाहत असतात तर आषाढी वारीच्या अगोदरपासून आळंदीमध्ये भक्तीचा महासागर फुलतो आणि ज्येष्ठ अष्टमीला माऊलींच्या पालखीचे प्रस्थान होते. त्यामुळे षष्टी व सप्तमीला अलंकापुरीसह इंद्रायणी घाटावर भक्तीचा महासागर ओसंडत असतो.

या आळंदीनगरीमध्ये माऊली.. माऊली.. एकच शब्द संपूर्ण अलंकापुरी दणाणून सोडतो. मात्र, यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आषाढीवारी सोहळा रद्द करण्यात आल्याने आळंदीत येणारा वैष्णवांचा महासागर थांबला आहे.

इंद्रायणी घाटाच्या तीरावर दिवसभर फेर फुगड्या, नाम घोष करत वारकरी प्रस्थान पूर्वीचा आनंद मनसोक्त लुटत असतात. टाळ-मृदंगाचा निनाद व ज्ञानोबा माऊलींच्या घोषाने संपूर्ण अलंकापुरी दुमदुमून जाते. मात्र, यंदा असे चित्र पाहायला मिळत नाही.

हेही वाचा -आषाढी वारी..! संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याला आजपासून सुरुवात

Last Updated : Jun 13, 2020, 11:31 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details