खेड (पुणे) -खेडमध्ये सुरू असलेल्या राजकीय नाट्याला आता आणखी वेगळे वळण लागले आहे. पंचायत समितीचे शिवसेनेचे सभापती भगवान पोखरकर यांच्या विरुद्ध दाखल केलेला अविश्वास ठराव अकरा विरुद्ध तीन अशा मतांनी मंजूर झाला आहे. स्वपक्षातील सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने दाखल केलेला अविश्वास ठराव, त्यानंतर सदस्यांचा डोणजे येथील रिसॉर्टवर मुक्काम, तिथे जाऊन सभापती व शिवसेना समर्थकांकडून राडा, त्यानंतर पोखरकरांना झालेली अटक या नाट्यमय घडामोडीनंतर खेड तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच सभापतींवर अविश्वास ठराव मंजूर झाला आहे.
हेही वाचा -पुणे अंशतः अनलॉक.. सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सर्व दुकाने उघडण्यास परवानगी
सभा सुरू झाल्यानंतर सभापती पोखरकर, काँग्रेसचे सदस्य अमोल पवार, शिवसेनेचे बंडखोर सदस्य अंकुश राक्षे यांची भाषणे झाली. अविश्वास ठराव मंजूर करणे तालुक्याच्या इभ्रतीच्या दृष्टीने योग्य नाही. सभापती येथेच राजीनामा देतील, ठराव मागे घ्या, असा प्रस्ताव अमोल पवार यांनी मांडला. पोखरकरांनीही तशी विनंती केली, पण त्यांना अविश्वास ठरावावर सह्या केलेल्या ११ सदस्यांनी प्रतिसाद दिला नाही. पीठासीन अधिकाऱ्यांनी ठराव मंजुरीसाठी मांडल्यानंतर ११ सदस्यांनी ठरावाच्या बाजूने हात वर करून पाठिंबा दिला. शिवसेनेचे सुभद्रा शिंदे, अमर कांबळे, वैशाली जाधव, सुनिता सांडभोर, अंकुश राक्षे, मच्छिंद्र गावडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण चौधरी, मंदाबाई शिंदे, नंदा सुकाळे व वैशाली गव्हाणे आणि भाजपचे सदस्य उपसभापती चांगदेव शिवेकर यांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले. तर, शिवसेनेचे सभापती पोखरकर, ज्योती अरगडे आणि काँग्रेसचे अमोल पवार यांनी ठरावाच्या विरुद्ध मतदान केले.