पुणे - राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. ही संख्या आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येत नाही तोपर्यंत, एकही महाविद्यालय सुरू होणार नाही, अशी भूमिका राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठात घेतलेल्या पत्रकार परिषदेत मांडली.
आगामी काही दिवसांतच महाराष्ट्रात दोन लाख विद्यार्थ्यांची ऑनलाइन परीक्षा पार पडणार आहे. त्यासंदर्भात उदय सामंत यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील कुलगुरू आणि प्राध्यापकांची बैठक घेत तयारीचा आढावा घेतला. उदय सामंत म्हणाले, राज्यात सध्या अनलॉकची प्रक्रिया सुरू आहे. टप्प्याटप्प्याने अनेक गोष्टी सुरू झाल्या आहेत. राज्यातील अडीच लाख विद्यार्थी परीक्षा देणार असून त्यातील दोन लाख ऑनलाइन तर, उर्वरित पन्नास हजार ऑफलाइन पद्धतीने अंतिम वर्षाच्या परीक्षा देणार आहेत. या परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाची मदत घेण्यात येणार आहे. याशिवाय राज्य शासनाने कोविड-१९ पार्श्वभूमीवर घालून देण्यात आलेल्या निकषांचेही काटेकोरपणे पालन केले जाणार आहे.