पुणे: राज्यातील रस्त्यांची झालेली चाळण आणि ट्रॅफिकच्या समस्येवर राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच नितीन गडकरींवर टीका केली. देशाचे केंद्रीय रस्ते मंत्री महाराष्ट्राचे असून सुद्धा मुंबई-गोवा महामार्गाला 17 वर्षे लागतात, हे महाराष्ट्राचे अपयश असल्याची टीका राज ठाकरेंनी केली आहे. सध्या सगळ्याच राजकीय पक्षाची मिली भगत आहे. राज्यात विरोधी पक्षनेताच राहिलेला नाही. विरोधी पक्षच राहिला नाही,अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी दिली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. राज ठाकरेंचा पुणे दौरा हा दोन दिवसांचा असणार आहे. पुण्याच्या दौऱ्यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत सध्या राजकारण, रस्त्यांची स्थिती आदी विषयांवरुन त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला.
भाजापाबरोबर युती नाही: टोल नाका फोडल्याप्रकरणी भाजपाकडून अमित ठाकरेंवर टीका केली जात आहे. त्यावरही राज ठाकरे यांनी भाष्य केले. निवडणुकांमध्ये टोलमुक्तीचे आश्वासन देणाऱ्यांची यावर आज काय भूमिका? रस्त्याची अवस्था काय आहे? म्हैसकर नावाची व्यक्ती कोण आहे? ज्याला हे सगळे टोलचे कॉन्ट्रॅक्ट भेटतात. याचा अभ्यास भाजपाने करावा, त्याचे उत्तर द्यावे, असे म्हणत राज ठाकरेंनी भाजपावर जोरदार हल्ला चढवला. कुणी कुणाला भेटला की युती होत नसते. आपण भाजपासोबत जाणार नसल्याचे त्यांनी पुनरुच्चार केला.
अमित टोल फोडत नाही: सिन्नर तालुक्यातील समृद्धी महामार्गावरील टोल नाका मनसेच्या कार्यकर्त्यांनी फोडला होता. त्यावरुन भाजपाच्या नेत्यांकडून टीका केली जात आहे. यावर राज ठाकरेंनी भाजपावर जोरदार हल्ला चढवला.अमित टोल फोडत चाललाय, असं नाही. तो महाराष्ट्र दौरा करत आहे. अमित राजकारणात येतोय म्हणून,असे आरोप केले जात आहेत. समोरचा माणूस उद्धटपणाने बोलला, त्यामुळे ही प्रतिक्रिया आली असल्याचेही राज ठाकरे म्हणाले. अमित ठाकरे हे महाराष्ट्र दौऱ्यावर होते. सिन्नर येथील समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर त्यांना अडविण्यात आले होते. त्यावेळी टोल नाक्यावरील कर्मचारी उद्धटपणे बोलल्याने मनसे कार्यकर्त्यांनी टोलनाका फोडला होता. त्यावरुन मनसेविरुद्ध भाजप असा वाद पेटला होता. यावरुन राज ठाकरेंनी भाजपावर जोरदार हल्ला चढवला. भाजपाने टोलमुक्त महाराष्ट्रबद्दल बोलावे. कोण आहे म्हैसकर? त्यालाच का सगळे टोल मिळतात? कोण आहे तो? असा प्रश्नांची तोफ राज ठाकरेंनी डागली.
गडकरींवर पहिल्यांदाच टीका: समृध्दी महामार्गावरील अपघातात आतापर्यंत 400 जणांचा जीव गेला आहे. काम नीट करत नाहीत. मुबंई गोवा रस्त्याचे काम 17 वर्षापासून सुरू आहे. रस्ते बनवणारे केंद्रातले मंत्री महाराष्ट्राचे आहेत, तरी महाराष्ट्राचे रस्ते खराब आहेत. रस्त्याच्या अवस्थेवरुन बोलताना राज ठाकरे म्हणाले की, पत्रकारांनी त्यांना प्रश्न केले पाहिजे. रस्त्याची अवस्था अशी का आहे, हे पालकमंत्र्यांना विचारले पाहिजे. महाराष्ट्रात असे रस्ते असणे आणि रस्तांचे काम इतक्या संथ गतीने चालणे हे गडकरींचे अपयश असल्याची टीका राज ठाकरेंनी केली. वांद्रे-वरळी सी लिंकला 10 वर्ष लागली आणि रामायणात रामसेतू पूल फक्त 12 वर्षात झाला. पण येथील साधे रस्ते लवकर होईनात,असे म्हणत राज ठाकरे यांनी रस्त्यांच्या कामांवर टीका केली.