पुणे - देशात सध्या सरकारकडून २२ नवीन ग्रीन मार्ग, १०० विमानतळे, नवीन जलवाहतुकीचे मार्ग याचे काम सुरू आहे. या माध्यमातून देशातील मध्यम आणि लघु उद्योग क्षेत्राचे आर्थिक स्थैर्य वाढवून देण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचे सकारात्मक परिणाम लवकरच दिसून येतील. तसेच लघु, मध्यम उद्योग व्यावसायिक कंपन्यांनी छोट्या शहरांमध्ये आपले पाय रोवले पाहिजेत, असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
पुण्यात मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अॅन्ड अॅग्रीकल्चर इंडस्ट्रीज तर्फे एक दिवसीय इनोव्हेशन कॉन्क्लेव्हचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, डॉ. अनिल काकोडकर, प्रदीप भार्गवा यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना गडकरी म्हणाले, फ्युअर इंटरनागझियोनाल झुजामेनार बाईट (जीआयझेड) जीएमबीएच, भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या सहकार्याने पार पडत आहे. देशातील मुबंई, पुणे, बँगलोर या शहराची झपाट्याने वाढ होत असून अनेक उद्योगधंदे या शहरात येत आहेत. त्यामुळे आता लघु, मध्यम उद्योग व्यावसायिक कंपन्यांनी छोट्या शहरांमध्ये आपले पाय रोवले पाहिजेत. याकरता ज्या मुलभूत सोयीसुविधा लागतील त्या देण्यास हे सरकार कटिबध्द आहे.