पुणे - पुणे-सोलापूर रोडवरील कदम वाक वस्ती ग्रामपंचायतीसमोर एर्टिगा आणि ट्रकमध्ये रात्री पावणे एकच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील ९ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. हे सर्वजण महाविद्यालयीन तरुण होते, अशी माहिती समोर येत आहे.
पुणे-सोलापूर रस्त्यावर अपघात, ९ महाविद्यालयीन तरुणांचा मृत्यू.. कुटूंबीयांच्या स्वप्नांचा क्षणात चुराडा
अपघातातील मृत तरुण रायगड परिसरातून पर्यटन करुन आपापल्या घरी परतत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला.
शुक्रवारी सकाळी सर्व यवत येथून रायगडला फिरण्यास गेले होते आणि आज घरी सर्व येत होते. त्याच दरम्यान, हा अपघात झाला. दत्ता गणेश यादव आणि विशाल सुभाष यादव हे उंड्री येथील जेएसपीएम महाविद्यालयात शिक्षण घेत होते. निखिल चंद्रकांत वाबळे हा रुग्णालयात बाऊन्सरचे काम करत होता. तर शुभम भिसे, अक्षय चंद्रकांत घिगे बीसीएस करत होते. लोणी काळभोर येथे बीए करत असलेला सोनू उर्फ नूर महमद दाया, घरगुती व्यवसाय सांभाळणारा अक्षय भरत वायकर, खासगी काम करुन कुटुंबाला हातभार लावणारा जुबेर अजित मुलानी आणि इंजिनिअर बनण्याचे स्वप्न पाहणारा परवेज अशपाक आत्तार, असे हे नऊ तरुण मित्र एकत्र फिरायला गेले. मात्र, पुन्हा घरी पोहचू शकले नाहीत.
फिरायला जात असताना परवेज आत्तार याने लोणी काळभोर 'रेडी टू गो' असे लिहित सर्व मित्रांचा सेल्फी आपल्या व्हॉट्सअप स्टेटस ठेवला होता. आपली फिरायला जाण्याची तयारी झाली आहे, अशा भावनेने परवेजने हा मजकूर लिहिला होता. मात्र, नियतीच्या मनात काही वेगळेच होते. ज्या ठिकाणी या मित्रांनी हा फोटो काढला होता. त्याच भागात म्हणजेच लोणी काळभोर भागातच हा अपघात झाला. अपघातात मृत झालेल्या शुभम भिसे वगळता उर्वरित ८ जण वर्गमित्र होते. लहानपणी ते यवतमधील विद्या विकास मंदिर शाळेत शिकायला एकत्रच होते. शाळा संपल्यानंतरही या सर्व मित्रांच्या मैत्री कायम होती.