लोणावळ्यातही लागणार नाईट कर्फ्यू? नाताळसह नूतन वर्षाच्या स्वागताला येणाऱ्या पर्यटकांचा होणार हिरमोड - लोणावळ्यात संचारबंदी
नाताळ साजरा करण्यासाठी आणि नव वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात लोणावळाला भेट देणे पसंत करतात. त्यातच महानगरामध्ये नाईट कर्फ्यू लागू करण्यात आल्याने यंदा लोणावळ्यात गर्दी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी लोणावळा शहरातही नाईट कर्फ्यू लागू करण्याचा विचार केला आहे.

पुणे - लोणावळा शहरात ख्रिसमस नाताळ आणि नूतन वर्षाच स्वागत करण्यासाठी दरवर्षी हजारोंच्या संख्येने पर्यटक येत असतात. परंतु, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांची संख्या काही प्रमाणात घटू शकते. मात्र महानगरपालिकांच्या क्षेत्रांमध्ये नाईट कर्फ्यू लागू केल्याने पर्यटकांची पाऊले आपोआप लोणावळ्याकडे वळण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून राज्यशासनाकडे लोणावळ्यात देखील ख्रिसमस नाताळ आणि नूतन वर्षाच्या पार्श्वभूमीवर कर्फ्यू लावण्याचा प्रस्ताव लोणावळा पोलिसांनी सादर केला आहे. लोणावळ्याचे डीवायएसपी नवनीत कावत यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
लोणावळा दरवर्षी पर्यटकांच्या गर्दीने फुललेले असते
लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. परिसरात अनेक निसर्गरम्य अशी पर्यटनस्थळ असल्याने प्रत्येकाला लोणावळा शहर आकर्षित करत. दरवर्षी मुंबई, पुणे या शहरातून हजारो नागरिक विशेष सुट्टी काढून लोणावळा शहरात नूतन वर्षाचे स्वागत आणि नाताळ हा सण साजरा करण्यासाठी हमखास येतात. मात्र, यंदा त्यांच्या आनंदावर कोरोना विषाणुमुळे विरजन पडण्याची शक्यता आहे.