पुणे (पिंपरी) - शहरातील निगडी परिसरात मौज-मजा करण्यासाठी सायकल चोरी करणाऱ्या तीन अल्पवयीन मुलांना निगडी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 15 सायकली जप्त करण्यात आल्या आहेत. याबाबत पुढील कारवाई सुरू आहे. तसेच दुसऱ्या कारवाईमध्ये सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली. त्याच्याकडून सात मोबाईल आणि पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. शुभम उर्फ चिम्या शिवदास पवार, असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. दोन्ही कारवाई मिळवून पोलिसांनी 3 लाख आठ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
मौज-मजा करण्यासाठी सायकलची चोरी
निगडी परिसरात गस्त घालत असताना पोलीस कर्मचारी होनमाने यांना माहिती मिळाली की, प्राधिकरण अग्निशमन कार्यालयाजवळ काही मुले सायकलवरून फिरत आहेत. त्यांच्याकडे असलेली सायकल चोरीची आहे. त्यानुसार पोलिसांनी खात्री करून तीन मुलांना सायकलसह ताब्यात घेतले आणि सायकलबाबत विचारपूस केली. मुलांनी सुरुवातीला उडवा-उडवीची उत्तरे दिली. मात्र नंतर मोरेवस्ती, निगडी, साने चौक आणि परिसरातून सायकल चोरी केल्याचे सांगितले. मौज-मजा करण्यासाठी आपण सायकल चोरी करत असल्याची कबुली मुलांनी दिली आहे.