पुणे - चंद्र पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह. मानवी संस्कृतीच्या वाटचालीत चंद्राची नेहमी साथ राहिली आहे. या संस्कृतीमध्ये चंद्राला एक आगळे-वेगळे स्थान कायम राहिले आहे. बालपणीचा चंदामामा तरुणपणातील चंद्र; असा आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात चंद्र सोबतीला असतो. रात्रीच्या काळोखाला आपल्या मंद प्रकाशाने उजळून टाकणाऱ्या चंद्राचे आकर्षण सर्वांनाच असते. चंद्राचे धार्मिक महत्त्वही मोठे आहे. अशा या चंद्राची मनमोहक छबी टिपण्याची कसब अनेकजण दाखवत असतात. पुण्यातील एका तरुणाने चंद्राच्या वेगवेगळ्या भागांचे तब्बल ५५ हजारहून अधिक फोटो काढले. यातून चंद्राची अनोखी संपूर्ण प्रतिमा निर्माण करण्यात आली आहे. पुण्यातील प्रथमेश जाजू या १६ वर्षीय शिकाऊ अवकाश अभ्यासकाने ही चंद्राच्या ५५ हजार प्रतिमा एकत्र करत अनोखी छबी तयार केली आहे.
पहाटेपर्यंत जागून काढले ५५ हजार फोटो
प्रथमेश जाजू हा पुण्यातल्या ज्योतिर्विद्या संस्थेशी जोडलेला आहे. त्याने ३ मेच्या रात्री 1 ते पहाटे साडेपाच वाजण्याच्या दरम्यान घराच्या छतावरून चंद्राचे तब्बल ५५ हजार फोटो काढले. चंद्राच्या लहान लहान भागांचे फोटो प्रथमेशने काढले. प्रथमेशने ZWO ASI120MCs प्लांट इमेजिंग टेलिस्कोप कॅमेऱ्याने ही किमया साधली. प्रथमेशकडे असलेल्या या कॅमेरातून आधी व्हिडिओ निघतो आणि नंतर त्यातून २००० फोटो त्याला मिळतात. असे एकूण ३८ व्हिडिओ त्याने काढले. त्यातील २५ व्हिडिओ हे २००० फोटोंचे होते. तर उरलेले काही व्हिडिओ ५०० ते ७०० फोटोंचे होते. हा सर्व डेटा जवळपास १०० जीबीचा होता.