पुणे : वर्षानुवर्षे आपण आंधळेपणाने शिक्षण घेत आहोत. जुन्या अभ्यासक्रमातील प्रचंड माहितीच्या ओझ्याने आपण दबले गेले आहोत. ज्याचा आपल्याला व्यावहारिक आयुष्यात काहीच उपयोग होत नाही. मोबाईलच्या एका क्लिकवर सगळी माहिती उपलब्ध असते. त्यामुळे रट्टे मारण्याला आता काही अर्थ नाही. विद्यार्थ्यांमधील प्रतिभेला जागृत करण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरण उपयोगी ठरेल. प्रत्येक विद्यापीठ आणि शैक्षणिक संस्था आनंदाचे तसेच नवनिर्मितीचे कॅम्पस झाले पाहिजे. नवीन शैक्षिणक धोरण हे क्रांतिकारक पाऊल आहे, असे मत आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी व्यक्त केले.
एज्युयूथ मीट कार्यक्रमाचे आयोजन : आर्ट ऑफ लिव्हिंग फाऊंडेशनसह विविध नामवंत शैक्षणिक संस्थांच्या पुढाकाराने एज्युयूथ मीट हा कार्यक्रम कोथरुडमधील सूर्यकांत काकडे फार्म येथे आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी तरुणाईला मार्गदर्शन केले. 'करणार नाही आणि करु देणारही नाही,' अशी शपथ घेत पुण्यातील १ लाख २३ हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीचा संदेश दिला.
मान्यवरांची उपस्थिती : नॅकचे अध्यक्ष डॉ.भूषण पटवर्धन, खासदार विनय सहस्त्रबुद्धे, राजेश पांडे, माजी कुलगुरु डॉ. नितीन करमळकर, आर्ट ऑफ लिव्हिंगचे राजेश शास्तारे, एज्युयूथ मीटचे प्रमुख हिमांशू नगरकर, शेखर मुंदडा यांच्यासह संस्थाचालक आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. नव्या शैक्षणिक धोरण व तणावमुक्त शिक्षणासंदर्भात यासंदर्भात श्री श्री रविशंकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड व एशिया बुक ऑफ रेकॉर्ड यावेळी झाला.
उपक्रमात विविध संस्था सहभागी : आर्ट ऑफ लिव्हिंग फाऊंडेशन, भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, सिंबायोसिस, भारती विद्यापीठ, एमआयटी, डॉ.डी.वाय.पाटील संस्था, सूर्यदत्ता, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, एसपी, सीओईपी अशी महाविद्यालये, एनआरडीसीएम आणि एमआरडीसी यांसारख्या संस्था यामध्ये सहभागी झाल्या होत्या.