पुणे - आंबेगाव तालुक्यातील साकोरे येथे मुंबईहुन आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. खबरदारी म्हणून त्याच्या कुटुंबातील व संपर्कातील व्यक्तींना क्वारंटाईन करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.
मुंबईवरुन गावी परतलेल्या व्यक्तीला कोरोनाची लागण; आंबेगाव तालुक्यात भीतीचे वातावरण - कोरोना केसेस इन पुणे
आंबेगाव तालुक्यातील साकोरे गावात मुंबईहून परतलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली असून यामुळे आंबेगाव तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. त्याच्या कुटुंबातील व संपर्कातील व्यक्तींना क्वारंटाईन करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनासह नागरिक सतर्क राहून काम करत होते. मात्र, मागील आठ दिवसांपासून पुणे व मुंबई परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक आंबेगाव तालुक्यात दाखल होत आहेत. त्यामुळे कोरोनाचा समुह संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली जात होती. अशातच एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने आंबेगाव तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यात पुणे-मुंबई परिसरातुन मोठ्या संख्येने नागरिक दाखल झाले आहेत. या नागरिकांनी आपल्यातील कुठलेच आजार न लपवता प्राथमिक आरोग्य केंद्रात आपली आरोग्य तपासणी करुन घेऊन स्वत:ला स्वतंत्र क्वारंटाईन करुन घ्यावे. तसेच, कोरोनाचा समूह संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाला मदत करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.