नीरज चोप्राचे माजी प्रशिक्षक काशिनाथ नाईक पुणे :भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रानं जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताला पहिलं सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. नीरज चोप्रानं रविवारी रात्री ८८.१७ मीटर अंतरावर भाला फेकून हे सुवर्णपदक मिळवलं. त्याला या उंचीवर नेण्यात त्याच्या प्रशिक्षकाचाही महत्त्वाचा वाटा होता. त्याच्या प्रशिक्षकांमध्ये काशिनाथ नाईक यांचं नाव घेतलं जाते. काशिनाथ नाईक यांनी निरज चोप्रानं मिळवलेल्या यशाचा अभिमान असल्याचं स्पष्ट केलं आहे.
कोण आहेत काशिनाथ नाईक :काशिनाथ नाईक हे सिरसी तालुक्यातील बेंगळे गावचे रहिवासी आहेत. ते सध्या पुणेस्थित मिलिटरी स्पोर्ट्स ऑर्गनायझेशनमध्ये प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. काशिनाथ नाईक हे सुवर्णपदक विजेते नीरज चोप्राचे माजी प्रशिक्षक आहेत. काशिनाथ नाईकनं नवी दिल्ली येथ 2010 मध्ये झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भालाफेकमध्ये कांस्यपदक जिंकलं. त्यानंतर त्यांनी 2013 ते 2019 या कालावधीत आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलेल्या खेळाडूंना प्रशिक्षण दिलं आहे. यादरम्यान त्यांनी नीरज चोप्रालाही प्रशिक्षण दिलं आहे.
काशिनाथ नाईक यांच्या प्रशिक्षक असल्यावरुन वाद :काशिनाथ नाईक हे खरच नीरज चोप्राचे प्रशिक्षक आहेत का, यावरुन देखील मोठा वाद सुरू आहे. अॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाचे (एएफआय) प्रमुख आदिल सुमरिवाला यांनी नीरज चोप्राचे प्रशिक्षक म्हणून काशिनाथ नाईक यांच्याबद्दल मी कधीच ऐकलं नसल्याचं स्पष्ट केल्यानं हा वाद चिघळला होता. नीरजला गेली सहा वर्षे परदेशी प्रशिक्षकांनी प्रशिक्षण दिलं असून त्याचं श्रेय कोणीही घेऊ नये. काशिनाथ नाईक यांचं नाव मी कधी ऐकलं नाही, असं देखील AFI चे प्रमुख आदिल सुमरिवाला यांनी म्हटलं होतं. यावर नीरज चोप्राचे माजी प्रशिक्षक काशिनाथ नाईक यांनी 'मी निरज चोप्राचा प्रशिक्षक नसल्याचा संशय असणाऱ्यांना स्वतः नीरज चोप्रानंच उत्तर दिलं होतं. तो स्वतः मला भेटायला पुण्याला सहपरिवार आला होता, असंही काशिनाथ नाईक यांनी यावेळी सांगितलं. नीज चोप्राला प्रशिक्षण दिल्याबद्दल कर्नाटक सरकारनं 10 लाख रुपयांचं बक्षीसही दिल्याचा दावा त्यांनी केला आहे.
आणखी एका खेळाडूला देत आहेत प्रशिक्षण :नीरज चोप्रासारख्याच आणखी एका खेळाडूला मी प्रशिक्षण देत असून तो देखील भविष्यात चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे माझ्या प्रशिक्षक पदावर संशय घेणाऱ्या लोकांना मी एक चांगला प्रशिक्षक असल्याचा विश्वास वाटेल, असेही ते यावेळी म्हणाले. सध्या मनु डीपी हा तरुण खेळाडू भारतासाठी पुढं चांगली कामगिरी करेल, असा विश्वास देखील प्रशिक्षक काशिनाथ नाईक यांनी व्यक्त केला आहे. त्याचबरोबर नीरज चोप्रा यांनी केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल संपूर्ण देशवासीयांना गौरवाची बाब असून माझ्यासाठी देखील मोठी गोष्ट आहे, असं देखील काशिनाथ नाईक म्हणाले आहेत.
हेही वाचा -
- Neeraj Chopra Record : 'गोल्डन बॉय' च्या गावात एकच जल्लोष! 'देशासाठी अभिमानाचा क्षण', नीरज चोप्राच्या वडिलांची प्रतिक्रिया
- Neeraj Chopra News : नीरज चोप्राची ऐतिहासक कामगिरी, जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुर्वणपदक मिळविणारा ठरला पहिला भारतीय