पुणे- कवी तथा माजी आमदार ना. धों. महानोर यांचे वयाच्या ८१ वर्षी निधन झाले. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधे आज सकाळी साडेआठ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. उद्या पळसखेड या त्यांच्या गावी पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून ते व्हेंटीलेटरवर होते. महानोर यांच्या निधनावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दु:ख व्यक्त केले आहे.
कवी, गीतकार, शेतकरी, माजी आमदार अशी ना. धों. महानोर यांची चतुरस्त्र ओळख आहे. एकाहून एक सरस गीत रचनांसाठी महानोर प्रसिद्ध होते. त्यांनी लिहिलेली अनेक गीत आजही रसिकांच्या मनाचा ठाव घेतात. बालकवी आणि बहिणाबाईंचा वारसा समृद्ध करणारे कवी अशी देखील त्यांची ओळख आहे. महानोर यांचे लिखाण निसर्गाशी नाते जोडणारे होते. मी रात टाकली मी कात टाकली ही त्यांच्या लोकप्रिय गीतांपैकी एक रचना आहे. त्यांच्या रानातल्या कविता हा कविता संग्रह खूप गाजला होता. स्वतः शेतकरी असल्याने निसर्ग शेतीविषयी असलेले प्रेम त्यांच्या कवितेतून झळकायचे. दिवे लागणीची वेळ, पळसखेडची गाणी, जगाला प्रेम अर्पावे, गंगा वाहू दे निर्मळ ही त्यांची लोकप्रिय कविता संग्रह आहेत. याशिवाय त्यांनी एक होता विदूषक, जैत रे जैत, सर्जा, अजिंठा या चित्रपटासाठी गीत रचना केली आहे.
मातीची नाळ जुळणारा कवी-मराठी साहित्य विश्वातील एक मोठे नाव अशी त्यांची ओळख होती. मातीची नाळ जुळणारा आणि मातीची ओळख सांगणारा ग्रामीण भागातील लोकांचे जीवन आयुष्य आपल्या साहित्यात रेखाटणारा साहित्यिक, कवी व चित्रपट लेखक असा त्यांचा नावलौकिक होता. ते शरद पवार यांच्या जवळचे होते. ते विधान परिषदेवर आमदारसुद्धा होते. महानोरांचा जन्म महाराष्ट्रातल्या औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेड या गावी झाला. त्यांचे शालेय शिक्षण पळसखेड, पिंपळगाव व शेंदुर्णी येथे झाले. त्यानंतर जळगावातील महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला. मात्र त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पदवीच्या पहिल्या वर्षापर्यंतच झाले. महाविद्यालयीन शिक्षण सोडून शेती करायला ते आपल्या गावी परतले.