पुणे - विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी महिलांबाबत एक वक्तव्य केले होते. याप्रकरणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आज (बुधवारी) सिंहगड पोलीस ठाण्यात दरेकरांविरोधात कलम 501 नुसार तक्रार दाखल केली आहे.
याबाबत बोलताना राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर दरेकरांनी माफी मागायला हवी होती -
कोरोना काळापासून भारतीय जनता पक्ष सातत्याने महाराष्ट्राच्या परंपरेला नख लावण्याचा काम करत आहे. सातत्याने राज्याची बदनामी कशी करता येईल याकडे यांचे लक्ष लागले आहे. वैयक्तिक स्वार्थासाठी खालच्या पातळीवर जाऊन भाजप राजकारण करत आहे. तसेच स्वार्थासाठी कुरघोडी करण्यासाठी आणि साम, दाम, दंड यांचा वापर करून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिरूरमध्ये अतिशय अश्लील असे विधान केले आहे. समाजात बोलत असताना महिलांना लज्जा निर्माण होईल, असे वक्तव्य दरेकर यांनी केले आहे. त्या घटनेनंतर महिलांनी निषध व्यक्त केला. जनाची नाही तर मनाची मानून प्रवीण दरेकरांनी माफी मागितली पाहिजे होती. मात्र, त्यांनी उलट उत्तर दिले. म्हणून मी दरेकरांच्या विरोधात सिंहगड पोलीस चौकीत तक्रार दाखल केली आहे, अशी माहिती यावेळी चाकणकर यांनी दिली.
हेही वाचा -अनिल देशमुखांविरोधात आयकर विभागाला पुरावे सापडले!
काय आहे प्रकरण -
राष्ट्रवादी काँग्रेसला गरीब लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा ‘रंगलेल्या गालाचा’ मुका घेणारा पक्ष आहे, अशी खोचक टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली होती. त्यावर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी संताप व्यक्त केला आहे. दरेकर माफी मागा. नाही तर महिलांचा अपमान करणाऱ्यांचं आम्ही थोबाड आणि गाल रंगवू, असा इशारा रुपाली चाकणकर यांनी दिला होता.