पुणे: कसबा पोटनिवडणूकीच्या प्रचाराची रणधुमाळी आज पाच वाजता थंडवणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजप व महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार जोरदार सुरू आहे. कसबा पोटनिवडणूकीच्या प्रचारात भाजप उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ मुख्यमंंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः मैदानात उतरले आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत रोड शोचे आज पुण्यात आयोजन करण्यात आले. पुण्यातील समता भूमी येथून या रोड शोला सुरूवात झाली. मुख्यमंत्री शिंदे यांचा हा रोड शो गुरूवार पेठपर्यंत पोहचला असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून पक्षाचे झेंडे दाखवण्यात आले.
प्रचारासाठी रोड शोचे आयोजन: आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा पोटनिडणुक जाहीर करण्यात आली. कसबा पोटनिवडणूकीसाठी आज प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत रोड शोचे आयोजन करण्यात आले. या रोड शोची सुरूवात समता भूमी येथून होऊन बागवे कमान जनाई मळा, पालखी विठोबा चौक, हमाल तालीम, खाकसार मस्ज्जीद डाव्याबाजूने हिंदमाता चौक,साखळीपीर तालीम, तालीम लक्ष्मी रोड अल्पना टोकिज, हमजेखान चौक डाव्याबाजूने गोविंद हलवाई चौक, कस्तुरे चौक, मोमीनपुरा, विजय कदम चौक उजवीकडे सिंहगड गैरेज उजवीकडे सेंट हिल्डाज स्कूल, शितलादेवी चौक डावीकडे फडगेट पोलीस चौक आणि सेवा मित्र मंडळ येथील लालमहाल येथे समारोप झाला.
राष्ट्रवादी कॉंग्रेसची टीका: कसबा पोटनिवडणूकीच्या प्रचारासाठी काढण्यात आलेल्या रोड शोवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, मुख्यमंत्री कोणाचे आहेत ते सर्वांनाच माहित आहे. ते भारतीय जनता पार्टीचे सैनिक म्हणून काम करतात. त्यामुळे भाजपा सांगेल तेच त्यांना करावे लागते म्हणून भाजपाने सांगितले असेल म्हणून ते आज प्रचार करत आहेत. पण ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी असून त्यात काँग्रेस विजय प्राप्त करेल आणि इतिहास घडवेल, असा विश्वास रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केला आहे.