Sharad Pawar Pune PC : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी शरद पवार यांच्याबाबत काही गौप्यस्फोट केले होते. यावर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिलंय. त्यातील बऱ्याच गोष्टी मला पहिल्यांदाच कळल्या, असं शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले.
पुणे Sharad Pawar Pune PC : शरद पवार यांनी शनिवारी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेले गौप्यस्फोट, राज्यातील पाणी टंचाई आणि अतिवृष्टी याबाबत भाष्य केलं. अजित पवार यांनी केलेल्या गौप्यस्फोटानंतर शरद पवार यांनी उत्तर दिलं. अजित पवारांनी लोकसभेच्या चार जागा लढवण्याची घोषणा केली. त्यावरही शरद पवारांनी भाष्य केलं.
भूमिका आमच्यासी सुसंगत नव्हती : पक्षाचा अध्यक्ष मीच होतो, माझी भूमिका स्पष्ट होती, भाजपाबरोबर जायचं नव्हतं. भाजपासोबत जाण्याची भूमिका आमची नव्हती. अजित पवारांची भूमिका आमच्याशी सुसंगत नव्हती. मी राजीनामा देण्याचं कारण काय होतं? मी पक्षाचा अध्यक्ष होतो. माझ्या राजीनाम्याचा निर्णय सामूहिक झाला होता. भाजपासोबत जायचं नाही ही आमची भूमिका होती. ज्यांना जायचं होतं ते त्यांच्यासोबत गेले. मी त्यांना कधीच बोलावलं नाही, असं शरद पवार म्हणाले.
आमची लढाई भाजपाविरोधी :अजित पवारांच्या गौप्यस्फोटातील बऱ्याच गोष्टी मलाही पहिल्यांदाच कळल्या आहेत. माझ्याशी सुसंवाद ठेवण्याचा सगळ्याच नेत्यांना अधिकार होता. चर्चा झाली होती. ते ज्या रस्त्याने जाण्याचे सूचित करत होते, ते आम्हाला मान्य नव्हते. त्यांची भूमिका आमच्या विचारांशी सुसंगत नव्हती. त्यामुळे त्यांचा विचार मान्य केला नाही. आजही आमची भूमिका भाजपाविरोधी आहे. शिवसेनेच्या विरोधी नाही, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.
लवकर नुकसान भरपाई देण्याची मागणी :राज्यातील काही भागात दुष्काळी स्थिती आहे. काही भागात अतिवृष्टीनं शेतीचं, पिकाचं, फळबागाचं मोठं नुकसान झालं आहे. पंचनामे सुरू आहेत. मात्र, त्याचा वेग खूप कमी आहे. त्यामुळे शतकरी अस्वस्थ आहेत. राज्य सरकारनं मदतीची भूमिका घेतली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.