पुणे :अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या 54 आमदारांपैकी 30 आमदारांनी सरकारला पाठिंबा दिला आहे. 30 आमदार शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. नऊ आमदारांनी रविवारी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. अजित पवार यांनी पुन्हा सरकारमध्ये सामील झाले आहे. अजित पवार यांच्या बंडानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भूमिका मांडली आहे. अजित पवार यांची भूमिका ही पक्षाची भूमिका नसल्याचे यावेळी पवार म्हणाले.
शरद पवार यांच्या समर्थनार्थ फ्लेक्स :आता पक्षात अजित पवार विरुद्ध शरद पवार असे चित्र पाहायला मिळत आहे. काही आमदार अजित पवार यांच्या मागे आहे, तर काही आमदार हे शरद पवार यांच्याबरोबर असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अश्यातच पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी आम्ही शेवटपर्यंत शरद पवार साहेबांच्या सोबत असल्याचे फ्लेक्स लावले आहे. 'वाट आहे संघांची... म्हणून थांबणार कोण ? सह्याद्री सोबत आहे... महाराष्ट्र सारा, दऱ्या खोऱ्यातून अन्...गाव शिवारातून वाहणारा वारा...मग संघर्षाला घाबरतय कोण ?.... लढणं आणि जिंकणं हे तर महाराष्ट्राच्या रक्तातच....मी शेवटच्या श्वासापर्यंत साहेबांच्या सोबत' अश्या आशयाचे फ्लेक्स पुण्यातील कोथरूड परिसरात गिरीश गुरनानी आणि समीर ऊत्तरकर यांनी लावले आहे.
विठ्ठलाला सोडून अजित पवारांसोबत : शनिवारी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानीपिंपरी चिंचवड येथील माजी आमदार विलास लांडे, नाना काटे, संजोग वाघीरे, यांनी पवारांची भेट घेतली होती. त्यांनी सांगितले होते की, आषाढी एकादशी झाल्याने आम्ही आमच्या विठ्ठलाची भेट घ्यायला आलो आहे. पण दुपारीच अजित पवार यांनी बंड केल्यावर ते विठ्ठलाला सोडून अजित पवार यांच्यासोबत गेल्याचे चित्र पाहायला मिळाले.