बारामती -घटनेनुसार राज्य सरकारने केलेल्या शिफारशींना मान्यता देणे, ही जबाबदारी राज्यपालांची असते. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये लोकशाहीची आणि घटनेची जबाबदारी न पाळणारा राज्यपाल कधी पाहिला नाही. हा चमत्कार सध्याच्या राज्यपालांनी केला, ही दुर्दैवी गोष्ट आहे, असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोशारी यांना लगावला. बारामती येथे माध्यमांशी त्यांनी संवाद साधला.
'केंद्र सरकार घेत आहे केवळ बघ्याची भूमिका'
पुढे ते म्हणाले, की विधान परिषदेच्या १२ आमदारांच्या नियुक्त्या अनेक दिवस उलटल्यानंतरही राज्यपाल कोशारी यांनी रखवडल्या आहेत. मोदी जेव्हा मुख्यमंत्री होते, तेव्हादेखील तत्कालीन राज्यपालांनी अशा प्रकारचा त्रास दिल्याच्या तक्रारी त्यांनी केल्या होत्या. महाराष्ट्रामध्येही राज्यपाल याच पद्धतीने राज्य शासनाला त्रास देण्याचा प्रयत्न करीत आहेत. यावेळी मात्र केंद्र सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. ही गोष्ट चिंताजनक आहे. शेतकरी आंदोलनाला शंभर दिवस उलटूनसुद्धा शेतकऱ्यांना खलिस्थानी, दहशतवादी संबोधत असतील तर यावर काय भाष्य करणार, असा सवाल त्यांनी केला.
'शेतकरीवर्गाची स्थिती नाजूक'
शेतकऱ्यांच्या भूमिकेसंदर्भात केंद्र सरकारने सामंजस्याची भूमिका न घेतल्यामुळे संसदेचे कामकाज बंद पडले. या प्रश्नावर शेतकरी जसे अस्वस्थ आहेत तसेच संसददेखील अस्वस्थ आहे. त्यामुळे याबाबतची प्रतिक्रिया उद्याच्या कामकाजात नक्की उमटेल, अशी आशा आहे. सध्या शेतकरीवर्गाची स्थिती नाजूक आहे. कधी नव्हे ते राज्य मोठ्या आर्थिक संकटात आहे. मात्र राज्य सरकार या सर्व अडचणींमधून नक्कीच मार्ग काढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.