पुणे:देशामध्ये भाजप सोयीनुसार विरोधकांचा अर्थ घेत असते. इतर वेळी सरकारमधील मंत्री अनेक विधेयक मांडतात. त्यावेळी विरोधी पक्षांना फोन करून बोलवतात, परंतु संसदेच्या उद्घाटनाच्या वेळी व्हाट्सअॅपवरती मेसेज करण्यात आला. देशात संविधान आहे, पण संविधानानुसार काहीच होत नाही. त्यामुळे देशांमधील लोकशाही धोक्यात आली आहे. देशात दडपशाही सुरू असल्याची घणाघाती टीका सुप्रिया सुळे यांनी आज पुण्यात सरकारवर केली आहे.
सध्या इव्हेंट माझा सुरू : संसदेचा उद्घाटन सोहळा हा देशाचा नसून व्यक्तीचा आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. एकीकडे राज्यसभा सारखे वरिष्ठ सभागृह आहे, त्याच्या अध्यक्षाला बोलावले जात नाही. लोकसभेच्या अध्यक्षाला बोलवले मग राज्यसभा ही संविधानात नाहीत का? तुम्ही राज्यसभेला टाकून हा कार्यक्रम घेत आहेत. त्याचा मोठा इव्हेंट करत आहात. कुठल्याही कार्यक्रमाचा इव्हेंट न करता देशातील रोजगारी आणि विकासदरावर काम करायला पाहिजे, पण सरकारमध्ये सध्या इव्हेंट सुरू आहे. दडपशाहीने हे सरकार चालू असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
जुने संसद भवन हेच माझ्यासाठी मंदिर :नवीन संसद भवन होत असले तरी लोकशाहीचे मंदिर आहे. परंतु माझ्यासाठी जुने संसद भवन हेच माझ्यासाठी मंदिर आहे. तिथल्या भिंती सुद्धा बोलक्या आहेत आणि तिथे देशाच्या अनेक नामवंत देश घडवणाऱ्या व्यक्तीने भाषण केलेली आहेत. त्यामुळे माझ्या हृदयात जुने संसद आहे आणि आम्ही सर्वजण तिथे या जनतेचे प्रतिनिधी म्हणून जातो. आमचे वैयक्तिक काही तिथे ओळख नसते. त्यामुळे लोकशाहीच्या मंदिरामध्ये सर्वांना विरोधकांना सत्ताधाऱ्यांना विश्वासात घेऊन काम करणे आवश्यक असते. पण सध्या ते होत नसल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.