पुणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता पक्षामधील अंतर्गत नाराजी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना आज पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीचे आमंत्रण नव्हते. यावर, पक्षाला माझी आवश्यकता वाटली नसेल, त्यामुळे त्यांनी मला बोलावलं नाही, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली आहे.
राष्ट्रवादीत दोन गट पडले? : काल 'लोक माझा सांगती' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्या दरम्यान शरद पवारांनी राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले आणि एकच खळबळ उडाली. पक्षाच्या अनेक नेत्यांनी त्यांनी हा निर्णय मागे घ्यावा, असा आग्रह केला. त्यात जयंत पाटील सर्वात पुढे होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांचा एक गट आणि जयंत पाटलांचा एक गट, असे दोन गट पडले असल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. एकीकडे अजित पवार शरद पवारांच्या या निर्णयाचे समर्थन करत होते तर आणखी काही नेते मात्र शरद पवारच अध्यक्ष राहिले पाहिजे, अशी भूमिका मांडत होते.
'शरद पवारच अध्यक्ष व्हावेत अशी इच्छा' : शरद पवार हे आपला निर्णय जाहीर करेपर्यंत आपण वाट पाहू, त्यानंतर हा पक्षाचा विषय आहे. परंतु आवश्यकता वाटली नाही म्हणून त्यांनी मला बोलावलं नसेल, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी आज पुण्यात दिली आहे. ते पुण्यातील साखर संकुल येथे पत्रकारांशी संवाद साधत होते. काल झालेला निर्णय हा खरंच कुणाला माहीत नव्हता. परंतु तिथल्या सगळ्या परिस्थितीवरून असे दिसते की, हा निर्णय अजित पवार आणि सुप्रिया सुळे या दोघांना माहीत असावा. परंतु मला त्यावेळेस जे योग्य वाटले ते मी तुम्हाला सांगितले. मी माझ्या भावना व्यक्त केल्या. आम्ही शरद पवार साहेबांना बघून मोठे झालो आहोत. त्यामुळे ते अध्यक्ष असावेत हा आमचा आग्रह आहे. परंतु आता पक्षाच्या बैठकीत यावर निर्णय होईल. मात्र शरद पवारच अध्यक्ष व्हावेत अशी माझी अपेक्षा असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
राज्यात राजकीय भूकंप होईल? : सध्या राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती शिवसेनेसारखी होते आहे का, अशी राजकीय चर्चा सुरु आहे. वारसदाराच्या हक्कावरून आणि पक्षाचा अध्यक्ष कोण होणार यावरून पक्षामध्ये मोठी अंतर्गत गटबाजी दिसून येत आहे. त्याच वेळेस अजित पवार यांच्या भाजप प्रवेशाच्या सुद्धा चर्चा आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये पुन्हा काही राजकीय भूकंप होईल का हे पाहणं महत्त्वाचं आहे.
हेही वाचा :Sharad Pawar Resigns : शरद पवारांचे मन वळविण्याचा प्रयत्न करत आहोत-अनिल पाटील