पुणे- भाजप शिवसेनेकडून साम- दाम- दंड- भेद वापरून इतर पक्षातील लोकांना पक्षात घेण्याचा प्रकार सुरू आहे. महाराष्ट्राची जनता या प्रकाराला वैतागली असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे. सचिन अहिरांच्या शिवसेना प्रवेशानंतर जयंत पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली.
आमच्यातल्या 'भाकडगाई' भाजप-सेनेत गेले त्याचे दुःख नाही - जयंत पाटील सरकारी दबावाला जे बळी पडतात, तसेच दबाव आणून साम-दाम-दंड-भेद वापरून भाजप-शिवसेना सर्वांना नमविण्याचे काम करत आहे. आमच्यातल्या काही भाकडगाई तिकडे जात आहेत. मात्र, त्याचे आम्हाला काही दुःख नाही, असे सांगत आम्ही पुन्हा पक्ष उभा करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाकडून लढण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती सध्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून घेतल्या जात आहेत. शनिवारी पुण्यातल्या ग्रामीण भागातील इच्छुकांच्या मुलाखती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घेतल्या, त्यावेळी ते बोलत होते. ज्याप्रमाणे भाजप आणि शिवसेनेमध्ये हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक जात आहे. तसेच त्यांच्याकडूनही काही लोक आमच्याकडे येण्याची शक्यता असल्याचे जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले. ज्या ज्या मतदारसंघातले आमचे लोक तिकडे जात आहेत त्या त्या ठिकाणचे त्यांचे लोक आम्हाला संपर्क करत असल्याचे पाटील म्हणाले. मात्र, भाजप-शिवसेनेने ज्याप्रमाणे डोळे झाकून लोकांना प्रवेश दिला आहे, तसे आम्ही करणार नाही. सध्या काही लोकांशी आम्ही चर्चा करतोय, एकदाही लाट ओसरली की भाजप शिवसेनेतून आमच्याकडे येणाऱ्यांची संख्या वाढलेली दिसेल, असा दावा जयंत पाटील यांनी यावेळी केला.
ठाणे, जळगाव तसेच नाशिक जिल्ह्यात झालेल्या मुलाखतीदरम्यान इतर पक्षाच्या काही लोकांनी खासगीत आमची भेट घेतली. मात्र, सध्या तरी आम्ही त्यांच्या मुलाखती घेतलेल्या नाहीत, असे जयंत पाटील म्हणाले. भाजप शिवसेनेकडून केल्या जाणाऱया या दबावतंत्राला महाराष्ट्राची जनता नक्कीच उत्तर देईल. युतीच्या पदरात जनतेने भरभरून माप टाकले मात्र, त्यांना स्वतःवर आत्मविश्वास नाही. इतर पक्षातील लोक त्यांना घ्यावे लागतात, अशा भ्रष्ट पद्धतीने त्यांचा कारभार सध्या सुरू आहे. मात्र, महाराष्ट्राच्या जनतेला त्याचा तिटकारा आला असल्याचे जयंत पाटील यावेळी म्हणाले.