पुणे -सध्याच्या राजकीय घडामोडींवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची आज पुण्यात बैठक होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत शिवाजीनगरमधील मोदीबागेत (शरद पवारांचे निवासस्थान) ही बैठक होणार आहे. दरम्यान, जनतेच्या मनातील सरकार आणण्यासाठी पवारसाहेब प्रयत्न करत असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बैठकीपूर्वी दिला.
या बैठकीसाठी खासदार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार हसन मुश्रीफ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार धनंजय मुंडे, प्रवक्ते आमदार नवाब मलिक, खासदार सुनिल तटकरे, आमदार दिलीप वळसे पाटील हे याठिकाणी दाखल झाले आहेत. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे ३ पक्ष मिळून सत्ता स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. सत्ता स्थापन करताना पक्षाची नेमकी काय भूमिका असेल यावर चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजीत केली आहे.