पुणे- जिल्ह्यातील निवडणुकींच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने आज पुण्यात संयुक्त बैठक घेतली. पुणे जिल्ह्यातील ४ लोकसभा मतदारसंघासाठी दोन्ही पक्षांची संयुक्त बैठक घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार ही बैठक घेण्यात आली. दोन्ही पक्षांमध्ये निवडणुकीदरम्यान समन्वय असावा, या दृष्टीने बैठकीत चर्चा झाली. तसेच जातीयवादी पक्षांचा पराभव करण्यासाठी रणनीती ठरवण्यात आली. काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या पुण्यातील निवासस्थानी ही बैठक पार पडली.
या बैठकीला हर्षवर्धन पाटील माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे तसेच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप उपस्थित होते. या बैठकीच्या माध्यमातून निवडणुकीचे नियोजन आणि दोन्ही पक्षांदरम्यान समन्वय कसा साधता येईल, या दृष्टीने चर्चा झाल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. तसेच निवडणुकीला सामोरे जात असताना दोन्ही पक्षांमध्ये गैरसमज दूर करण्याच्या दृष्टीकोनातून जिल्हा पातळीवर अशा प्रकारच्या बैठका आयोजित करण्यात येत आहेत. त्याचाच भाग म्हणून पुण्यातील ही बैठक होती, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.