पिंपरी चिंचवड - "भाजपच्या बैलाला पाच टक्के पाहिजे", "भाजपच्या बैलाला शहर वाटून पाहिजे", "नही चलेगी, नही चलेगी, टक्केवारी नही चलेगी" अशा जोरदार घोषणा देत राष्ट्रवादीच्यावतीने शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी भाजपच्या भ्रष्टाचारी कारभाराविरोधात पिंपरी-चिंचवड महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. पोलिसांनी प्रवेशद्वारावर अडवल्याने ठिय्या मांडून भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ जागरण गोंधळ घालण्यात आला. तर, भाजपच्या भ्रष्ट्राचारी कारभारामुळे महापालिकेवरील नागरिकांचा विश्वास उडालेला असल्याने स्थायी समितीबरोबर महापालिका बरखास्त करण्याची मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली.
- पालिकेच्या गेटवरच ठिय्या -
पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर निदर्शने करून पिंपरी चौकापासून मोरवाडी चौक मार्गे महापालिकेवर धडक मोर्चा काढण्यात आला. दरम्यान, पोलीस आणि महापालिका सुरक्षारक्षकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा मोर्चा महापालिका प्रवेशद्वारावर अडवला. आंदोलक राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पोलीस आणि सुरक्षा अधिकाऱ्यांनी आत प्रवेश करू न दिल्याने अखेर लोकशाही मार्गाने प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन सुरू केले.
पोतदार, नंदीबैल, वासुदेव, गोंधळी यांच्या आंदोलनातील सहभागाने जागरण गोंधळ घालत भाजपच्या भ्रष्टाचारी व टक्केवारीच्या कारभाराचा निषेध करण्यात आला. आंदोलनात "भ्रष्टाचारी भाजपचा धिक्कार असो", "स्थायी समिती बरखास्त करा", महापालिकेत भ्रष्टाचाराचा जोर, भाजपवाले चोर", "भाजप शहरात कोण लुटेरे, सत्ताधारी भाजप लुटेरे", "सत्ताधारी दालनात वसुलीचा गल्ला, महापालिका तिजोरीवर भाजपचा डल्ला", "सत्ताधा-यांच्या दालनात पैशांचा पाऊस, पिंपरी-चिंचवडमध्ये भ्रष्टाचाराचा धुडगूस", "महापालिकेचा केला वसुली अड्डा, महापालिका तिजोरीचा खड्डा", अशी जोरदार घोषणाबाजी या आंदोलनात करण्यात आली.