पुणेWheelchair Rugby Tournament :भारतीय रग्बी संघटना(रग्बी इंडिया), भारतीय व्हिलचेअर रग्बी संघटना, मित्सुबिशी महामंडळाच्या वतीनं पुण्यातील बालेवाडी येथे पाचव्या राष्ट्रीय व्हिलचेअर रग्बी स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं. यात महाराष्ट्र, बिहार, राजस्थान, कर्नाटक, केरळ, चंदीगड अशा 14 राज्यातील संघांनी सहभाग घेतला.
भारतात 5 राष्ट्रीय स्पर्धा :व्हीलचेअर रग्बी हा दिव्यांग लोकांसाठी एक खेळ आहे. या गेममध्ये, सर्व खेळाडू व्हीलचेअरवर असतात. एका संघात 12 खेळाडू सहभागी होऊ शकतात. विरोधी संघाला गोल करण्यासाठी 40 सेकंद दिले जातात. हा आंतरराष्ट्रीय खेळ असून भारतात 5 राष्ट्रीय स्पर्धा झाल्या आहेत. यावर्षी पुण्याला यजमानपदाचा हा मान मिळालाय. पुण्यात झालेल्या स्पर्धेत महाराष्ट्रानं विजेतेपद पटकावलं आहे.
आमच्यासाठी ऊर्जा देणारा खेळ :स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंनी या खेळाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत खेळामुळे जगण्याची उभारी मिळाल्याची भावना व्यक्त केली. दिव्यांग असल्यामुळं प्रवास करण्यात मर्यादा येतात. पण व्हीलचेअर रग्बीमुळे मिळालेली ऊर्जा अनेक मर्यांदाचा विसर पडायला लावते. आमच्या खेळाच्या आवडीमुळं आम्ही व्हीलचेअर रग्बी पाहून संघात सहभागी झालो. आपण दिव्यांग असूनही जेव्हा आपण हा खेळ खेळतो, ही भावना कमालीची सुखावणारी आहे. इतर दिव्यांग बांधव-भगिनींनी यातून प्रेरणा घेतली तरी या स्पर्धेच्या आयोजनाचं उद्दिष्ट साधलं जाईल, असा विश्वास स्पर्धेत सहभागी झालेल्या अनेक खेळाडूंनी व्यक्त केला.
स्पर्धेत 14 राज्यांचे संघ सहभागी :भारतीय रग्बी युनियनचे व्यवस्थापक संदीप मोसमकर यांनी या स्पर्धेबद्दल माहिती देताना, व्हीलचेअर रग्बी हा दिव्यांग खेळाडूंसाठी तयार करण्यात आलेला खेळ असल्याचं सांगितलं. आतापर्यंत 5 राष्ट्रीय स्पर्धा आपल्या इथं झाल्यात. चार बिहारमध्ये झाल्या. यावर्षी 5 वी राष्ट्रीय स्पर्धेच्या आयोजनाचा मान पुण्याला मिळाला. यंदाच्या स्पर्धेत 14 राज्यांचा संघ सहभागी झाले. या खेळामुळं मिळणारी शारीरिक आणि मानसिक ऊर्जा अनेक अनेक आघाड्यांवर महत्त्वाची ठरत असल्याबद्दल मोसमकर यांनी समाधान व्यक्त केलं.