पिंपरी-चिंचवड :स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी (Azadi Ka Amrit Mohotsav) वर्षाचे औचित्य साधून यावर्षीपासून महापालिकेच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation) पिंपरी येथील, मुख्य प्रशासकीय भवन आणि सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दररोज सकाळी १० वाजता राष्ट्रगीत ( National Anthem In PCMC ) वाजवले जाणार आहे. याबाबत आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी निर्णय घेतला आहे. भारतीय स्वातंत्र्यदिनापासून म्हणजेच दि. १५ ऑगस्ट २०२२ पासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश आयुक्त पाटील यांनी दिले आहे. याबाबत मनसेचे पदाधिकारी रुपेश पटेकर यांनी पाठपुरावा केला होता, त्याला यश प्राप्त झाले आहे.
हर घर तिरंगा या उपक्रमा अंतर्गत :देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त महापालिकेच्या वतीने शहरात विविध उपक्रम राबविले जात आहेत. हर घर तिरंगा या उपक्रमा अंतर्गत प्रत्येक नागरिकांच्या घरावर तसेच सर्व शासकीय, निमशासकीय, खासगी आस्थापना, सहकारी संस्थांच्या इमारतीवर राष्ट्रध्वजाची उभारणी स्वयंस्फुर्तीने करण्यासाठी महापालिकेच्या वतीने सर्वांना आवाहन करण्यात येत आहे. जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र असणा-या भारत देशामध्ये विविध जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदतात. देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता प्रत्येकाच्या अंगी यावी म्हणून, प्रत्येकजण सदैव प्रयत्न करत असतो.