पुणे- राज्यातल्या महाविद्यालयांमधील कामकाजाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली पाहिजे, अशा प्रकारचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 19 फेब्रुवारीपासून या उपक्रमाची सुरुवात केली जाईल, अशी माहिती राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत बोलताना... हेही वाचा-
पुणे शहरातील विविध शैक्षणिक संस्था, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू यांच्यासह शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर आणि शिक्षण क्षेत्रातील अधिकारी यांच्यासोबत उदय सामंत यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीनंतर सामंत बोलत होते.
'हा' उपक्रम राबविणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य
राज्यातील सध्याची विद्यार्थ्यांची उपस्थिती 50 टक्क्यांच्या पुढे असते. त्यानुसार दर दिवशी साधारण 15 लाख विद्यार्थी राष्ट्रगीत म्हणतील. त्यामुळे देशातील महाराष्ट्र हे अशा प्रकारचा उपक्रम राबवणारे पहिले राज्य ठरणार आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी नवा पॅटर्न
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनेसुद्धा राज्य सरकार पावले उचलत आहे. यासाठी मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस, सामाजिक क्षेत्रातील महिला तसेच विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांचा समावेश असलेली समिती स्थापन करण्यात येणार आहे. ही समिती तीन महिन्यात यावर निर्णय घेऊन मुलींना त्रास होणार नाही, असा पॅटर्न तयार करणार आहे.
महाविद्यालय परिसर होणार 'टोबॅको फ्री'
महाविद्यालयांचा परिसर 'टोबॅको फ्री' असावा यासाठी राज्य सरकारकडून काटेकोर अंमलबजावणी होणार आहे. यासाठी गरज पडल्यास त्याचे कायद्यात रूपांतर करण्याची मानसिकता आहे.
सीईटीचा फॉर्म चुकला तर फिस परत मिळणार
2016 च्या विद्यापीठ कायद्यात काही बदल करायची तयारी आहे. विद्यार्थ्यांना सीईटीचा फॉर्म भरताना येत असलेल्या अडचणींचा विचार करता फॉर्म भरताना जर फॉर्म चुकला तर विद्यार्थ्यांना पुन्हा फॉर्म फी भरावी लागत होती. मात्र, आता विद्यार्थ्यांना पुन्हा पैसे भरण्याची गरज नाही. फॉर्म चुकला तर विद्यार्थ्यांचे पैसे पुन्हा त्यांच्या खात्यात जमा केले जातील.
शिक्षकांसाठी ट्रेनिंग सेंटर सुरू होणार
आगामी काळात पुण्यात प्राध्यापक शिक्षकांना ट्रेनिंग देण्यासाठी ट्रेनिंग सेंटर सुरू करण्यात येणार आहे. दरम्यान, शैक्षणिक संस्थाचालकांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन पुण्यामध्ये दर तीन महिन्यांनी शैक्षणिक संस्थाचालकांच्या सोबत बैठक आयोजित केली जाणार असल्याचेही सामंत यांनी स्पष्ट केले.