पुणे -उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री होण्याच्या दृष्टीने त्यांनी आयुष्यात एकदाही प्रयत्न केले नाहीत. लोकांचे प्रश्न सोडविण्याचा त्यांना कुठलाही अनुभव नाही. त्यामुळे त्यांचे किती नुकसान होईल, याचे माहीत नाही पण राज्यातील जनतेचे नुकसान होणार आहे. ते मुख्यमंत्री होतील, असे कधीच वाटले नव्हते. माझ्या महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे जाईल याची चिंता मला आहे, अशी खरमरीत टीका माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी केली आहे. शनिवारी पुण्यातील 'सॅटर्डे क्लब' या कार्यक्रमात ते बोलत होते.
हेही वाचा -'शिवसेनेच्या तालमीतच मी तयार झालो, बाळासाहेब माझे गुरू'
मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नारायण राणे म्हणाले, उद्धव ठाकरे यांना प्रशासन चालवण्याचा थोडाही अनुभव नाही. त्यामुळे त्यांचे नुकसान होईल की नाही, माहीत नाही. मात्र, राज्यातील जनतेचे नुकसान होणार आहे. या उलट देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या पाच वर्षात अतिशय योग्य पद्धतीने मुख्यमंत्री म्हणून काम केले आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळात कोणत्याही प्रश्नाला उत्तर देणे टाळले नाही. त्यांनी सर्व प्रश्न यशस्वीपणे सोडविले, असेही राणे म्हणाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्याला घडवले असून आजही तेच आपले गुरू असल्याचेही राणे यांनी यावेळी सांगितले.