पुणेNana Patole :पुण्यातील काँग्रेस भवन येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी नाना पटोले म्हणाले की, सध्या राज्यात नव्हे तर देशात ट्रक ड्रायव्हरचं आंदोलन सुरू आहे. (MVA) हे आंदोलन फक्त ट्रक ड्रायव्हरचं नव्हे तर जे जे लोक वाहनं चालवतात त्यांच्यासाठी आहे. केंद्र सरकारनं हुकूमशाही पद्धतीनं खासदारांना निलंबित केलं आणि हा कायदा केला. या कायद्यात 7 लाख रु. दंड आणि 10 वर्ष शिक्षा आहे. आज अनेक लोक हे स्वतःची गाडी चालवतात. सरकारचं कायदा आणण्याचं उद्दिष्ट काय आहे. राज्य सरकार समृध्दी महामार्गाचा गौरव करतय, तर त्या रस्त्यावर अनेक अपघात होत आहेत. समृध्दी मार्गामध्ये फॉल्ट आहे. त्यात केमिकल वापरण्यात आलं नाही. कारण ते महाग होतं. सरकारमध्ये बसलेल्या लोकांची समृध्दी झाली आहे आणि लोकांचा मृत्यू होत आहे, अशी टीका यावेळी पटोले यांनी केली.
लोकशाही वाचली पाहिजे :नाना पटोले पुढे म्हणाले की, आज तरुणांचे अनेक प्रश्न आहेत. पेपर फुट होत आहे. राजस्थान सरकारने जो कायदा केला होता तसा कायदा राज्यात करण्यात यावा. सरकार मुलांची चेष्टा करत आहे. त्यांना कुठेही नोकरी देणार नाही. अनेक मुलं-मुली रडत आहेत. पीएचडी करणाऱ्या मुलांच्या परीक्षा होत नाहीत. राज्याचे एक उपमुख्यमंत्री सांगत आहेत की, पीएचडी करून काय दिवे लावणार आहे? या राज्यात काय चाललं आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. अनेक लोक हे आज रस्त्यावर येऊन आंदोलन करत आहेत. महागाई, बेरोजगारी असे अनेक प्रश्न आहेत. आज राजस्थानमध्ये 450 रुपयाला सिलेंडर देण्यात आला आहे. राज्यात का देत नाहीत. सरकार कोणाच्या म्हणण्यावर काम करत आहे. मूठभर लोकांसाठी केंद्र सरकार काम करत आहे. आज देशात लोकशाही वाचली पाहिजे आणि त्यासाठी आम्ही लढा देत आहोत.