पुणे - इंग्रजांच्या काळात देखील महामारीमध्ये मोफत लस देण्यात आली होती. मात्र, केंद्र सरकार जनतेकडून पैसे घेते आहे. या सरकारच्या चुकीच्या धोरणांचा मोठा फटका जनतेला बसला आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. शनिवारी (दि. 24 एप्रिल) नाना पटोले यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांसह पुण्याच्या विभागीय आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्या मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लस मोफत देण्याचे निवेदन दिले त्यानंतर ते बोलत होते.
इंग्रजांनी देखील फुकट लस दिली होती, मात्र केंद्र सरकार लसीचे पैसे घेते आहे - पटोले
इंग्रजांनी महामारीच्या काळात लस मोफत दिली होती. मात्र, आपले केंद्र सरकार जनतेकडून पैसे घेत आहे. या सरकारच्या चुकीच्या धोरणांचा मोठा फटका जनतेला बसला आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
ज्या देशांनी 70 ते 80 टक्के लसीकरण केले ते देश कोरोनामुक्त, लॉकडाऊनमुक्त झाले. आपल्या देशाच्या प्रमुखांनी या कोविडला लक्षात घेऊन त्यापद्धतीचे नियोजन देशात केले असते, तर निरपराध नागरिकांचा जीव वाचला असता. कोरोनामुळे देशात मृत्यूचे तांडव सुरू आहे. सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण गरजेचे होते. मात्र, केंद्राच्या चुकीच्या धोरणांमुळे देशाची अधोगती होत असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. सरकारने केवळ दोन कंपन्याना लस निर्मितीची परवानगी देऊन मोनोपॉली करायला संधी दिली. कोरोना प्रतिबंध लसीसाठी केंद्र, राज्य आणि खासगी रुग्णालयाला वेगवेगळ्या दरामध्ये लस खरेदी करावी लागणार आहे. याला विरोध आम्ही करत आहोत. पाकिस्तान सारख्या शत्रू देशाला लस मोफत दिली. मात्र, देशातील जनतेला विकत घ्यावी लागते आहे. केंद्र सरकारमध्ये बसलेल्या लोकांकडून नफेखोरी केली जाते आहे. देशातील अनेक राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे, तिथे कोरोनाची आकडेवारी लपवली जात आहे. महाराष्ट्रात कोरोनाची आकडेवारी लपवली जात नाही, असे पटोले म्हणाले.
हेही वाचा -जेजुरी अन् रांजणगाव येथील दोन नवीन ऑक्सिजन प्लांटला तातडीने वीजपुरवठा