महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'संभाजी विडी'चे नाव आता 'साबळे विडी'; 1 फेब्रुवारीपासून अंमलबजावणी - pune latest news

संभाजी विडीचे नाव बदलण्याचा निर्णय कंपनीतर्फे घेण्यात आले आहे. संभाजी विडी ऐवजी आता साबळे विडी, असे नवीन नाव देण्यात आले आहे. त्याची अंमलबजावणी ही 1 फेब्रुवारीपासून केली जाणार आहे.

name of sambhaji vidi is now sable vidi from one february
'संभाजी विडी'चे नाव आता 'साबळे विडी'; 1 फेब्रुवारीपासून अंमलबजावणी

By

Published : Jan 23, 2021, 6:41 PM IST

पुणे-साबळे वाघिरे आणि प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतर्फे संभाजी विडीचे नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संभाजी विडी ऐवजी आत्ता साबळे विडी, असे नवीन नाव देण्यात आले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या 1 फेब्रुवारीपासून होणार आहे, अशी माहिती साबळे वाघिरे आणि कंपनीचे संचालक संजय शंकर साबळे यांनी दिली.

संजय साबळे यांची प्रतिक्रिया

येत्या 1 फेब्रुवारीपासून नावात बदल -

येत्या 1 फेब्रुवारीपासून संभाजी ऐवजी साबळे विडी या बदललेल्या नवीन नावाने या विडीच्या विक्रीस प्रारंभ होणार आहे. विडीचे लेबल रंग, डिझाइन व विडीची बनावट तसेच टेस्टमध्ये कोणताही बदल केलेला नाही. पूर्वीप्रमाणेच या सर्व गोष्टी कायम ठेवून ग्राहकांना विडीची विक्री केली जाणार आहे. 10 सप्टेंबर रोजी आम्ही संभाजी विडीचे नाव बदलण्याचे जाहीर केले होते, त्यानुसार या विडीचे नाव बदलण्यात आले आहे. त्याची अंमलबजावणी ही 1 फेब्रुवारी पासून केली जाणार आहे, असेही यावेळी साबळे यांनी सांगितले.

विडी व्यवसायावर 60 ते 70 हजार कामगारांचा प्रपंच -

विडी व्यवसाय हा आमचा वडिलोपार्जित व्यवसाय आहे. या व्यवसायावर 60 ते 70 हजार कामगारांचा प्रपंच सुरु आहे. या कामगारांमध्ये मुख्यतः महिला कामगारांचा समावेश आहे. हा व्यवसाय बंद पडला, तर 60 ते 70 हजार कुटुंबांचा प्रपंच बंद पडेल. विडी व्यवसायात प्रचंड स्पर्धा आहे. त्यात नक्कल करणाऱ्यांमुळे या व्यवसायाला मोठा फटका बसतो. महाराष्ट्राबाहेरील विडी उत्पादने व उत्पादक महाराष्ट्रात घुसखोरी करू पाहत आहे. ज्यांचा वाईट परिणाम महाराष्ट्रातील उत्पादक व कामगारांवर होत आहे.

नाव बदलण्यासाठी शिवधर्म फाऊंडेशनचे आंदोलन -

पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात किल्ल्याच्या नजीक शिवधर्म फाउंडेशनने संभाजी बिडीवरील संभाजी महाराजांचे नाव हटवा, या मागणीसाठी ऑगस्टमध्ये आमरण उपोषण केले होते. यावेळी शिवधर्म फाउंडेशनला अनेक शिवप्रेमी संघटना आणि शिवप्रेमींनी पाठिंबा दिला होता. यानंतर साबळे-वाघिरे आणि कंपनीच्यावतीने पत्राद्वारे शिवधर्म फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक काटे यांना संभाजी विडीचे नाव बदलणार असल्याचे कळवले होते. कंपनीने आता संभाजी विडी हे नाव बदलून साबळे विडी, असे केले आहे.

हेही वाचा - प्रसाद लाड आणि राज ठाकरेंची भेट; मुंबई पालिका निवडणुकांसाठी भाजप-मनसे्ची युती?

ABOUT THE AUTHOR

...view details