कौतुकास्पद..! बकऱ्यांच्या कुर्बानीऐवजी रक्तदान करून बकरी ईद साजरी - पुणे मुस्लीम सत्यशोधक मंडळ बातमी
पुण्यातील काही मुस्लीम बांधवांनी आज (जि.1 ऑगस्ट) बकरी ईदच्या दिवशी बकऱ्यांची कुर्बानी न करता रक्त दान केले. तसेच ईदच्या खर्चाला फाटा देत कोरोना विरोधीतील लढ्यासाठी काही रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्यात आली. या उपक्रमाचे सर्वत्र कौतूक होत आहे.
पुणे- संपूर्ण देशभरात बकरी ईद मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. या दिवशी बकऱ्यांची कुर्बानी देऊन मुस्लीम बांधव हा सण साजरा करतात. पण, पुण्यातील काही मुस्लीम बांधवांनी या परंपरेला छेद देत बकऱ्यांच्या कुर्बानी देण्याऐवजी रक्तदान करुन बकरी ईद साजरी केली. मुस्लीम सत्यशोधन मंडळाच्यावतीने या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. साने गुरुजी स्मारक येथील एका हॉलमध्ये हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी बोलताना मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष समशोद्दीन तांबोळी म्हणाले, कोरोनाच्या या कठीण काळात सध्या देशात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे बकरी ईदच्या दिवशी प्राण्यांची कुर्बानी देण्याऐवजी स्वतः रक्त देऊन मानवतेसाठी ही बकरी ईद साजरी करता येईल, अशी कल्पना आम्हाला सुचली. त्यानुसार आज (दि. 1 ऑगस्ट) राज्यातील वेगवेगळ्या शहरात हे उपक्रम सुरू आहे.
मुस्लीम सत्यशोधक मंडळाला 50 वर्ष पूर्ण झाले आहेत. त्यानिमित्ताने राज्यातील मुस्लीम सत्यशोधक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ईद साध्या पद्धतीने साजरी करून काही पैसे एकत्र केले आणि हे पैसे कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी मुख्यमंत्री सहायता निधी देण्यात येणार असल्याचेही समशोद्दीन तांबोळी यांनी यावेळी सांगितले. मुस्लीम बांधवांनी ईद निमित्त आयोजित केलेल्या या अनोख्या उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे.