पिंपरी-चिंचवड (पुणे) -पिंपरी-चिंचवड शहरात प्रेमप्रकरणातून मुलीच्या घरच्यांनी एका तरुणाचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले आहे.
विराज विलास जगताप (वय 20 वर्षे), असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत जितेश वसंत जगताप (वय 44) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. 7 जून) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास आरोपींनी जितेश जगताप यांना फोन केला आणि 'विराजला आम्ही पिंपळे सौदागर येथे मारले आहे, येथून घेऊन जा,' असे सांगितले. तेव्हा जितेश, विराजची आई आणि इतर काही जण घटनास्थळी पोहोचले. विराज हा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. तक्रारदार जितेश हे विराजच्या जवळ गेले. अगदी शेवटच्या घटका मोजत असलेल्या विराजने सर्व प्रकार सांगितला.