पुणे - कोरोना आपत्तीमुळे येरवडा कारागृहातून जामिनावर सुटलेल्या सराईत आरोपीने चोरीला विरोध करणाऱ्या तरुणाची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. स्वारगेट परिसरात 3 सप्टेंबर रोजी हा प्रकार घडला होता. कोणताही पुरावा मागे नसताना पोलिसांनी कौशल्याने तपास करीत आरोपीला गजाआड केले. ऋषिकेष जीवराज कामठे (वय 34) असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. तर नागेश दगडू गुंड (वय 37) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 3 सप्टेंबर रोजी नागेश गुंड हा तुळजापूर येथून स्वारगेट येथील जेधे चौकात रात्री साडेअकरा वाजता उतरला. त्याचा मित्र कमलाकर घोडके हा त्याला घेऊन जाण्यासाठी येत असल्याने तो त्याची वाट पाहत उभा होता. यावेळी दुचाकीवरून आलेल्या एकाने त्याच्याजवळ येऊन पैसे आणि इतर ऐवज काढुन दे अशी मागणी केली. त्यास नागेश याने विरोध करून प्रतिकार केल्याने चोरट्याने त्याच्या पायावर वार केला आणि खिशातील रोख रक्कम आणि मोबाईल काढून घेत तेथून पळून गेला. जखमी नागेश ला रुग्णालयात दाखल केले होते मात्र, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात हत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.