पुणे : Mumbai Pune Expressway :मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर हायवे ट्रॅफीक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत ग्रॅन्ट्री उभारण्याचं काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत सुरू आहे. यासाठी पुन्हा 17 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर आणि 26 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 ते 1 या वेळेत द्रुतगतीमार्गाच्या मुंबई आणि पुणे मार्गावरील (Mumbai Pune Expressway) वाहतूक पूर्णत: बंद राहणार असल्याची माहिती, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं दिली आहे. यामुळे द्रुतगती मार्गानं प्रवास करणाऱ्या नागरिकांना खबरदारी घेण्याचं आव्हान करण्यात आलं आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर रोडब्लॉक घेण्यात येणार असल्यामुळं महामार्गारील वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
असा असणार ब्लॉक : 'एमसआरडीसी'च्या प्रसिद्धीपत्रकानुसार, मुंबई-पुणे महामार्गावर विविध ठिकाणी 17 ते 19 ऑक्टोबर असा सलग तीन दिवस ब्लॉक असणार आहे. त्यानंतर 26 ऑक्टोबर रोजी पुन्हा एकदा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या द्रुतगती मार्गावर 17 ऑक्टोबर रोजी पुणे वाहिनीवरील खंडाळा बोगद्याजवळ 47/900 कि.मी आणि लोणावळा बोगद्याजवळ 50/100 येथे ग्रॅन्ट्रीचं काम सुरू करण्यात येणार आहे. तर 18 ऑक्टोबर रोजी मुंबई वाहिनीवरील दस्तुरी पोलीस चौकीजवळ कि.मी. 44/800 आणि खालापूरजवळ कि.मी 33/800 ग्रॅन्ट्री उभारण्यात येणार आहे. तसेच 19 ऑक्टोबर रोजी ढेकू गाव कि.मी. 37/800 आणि कि.मी. 37 जवळ ग्रॅन्ट्री उभारण्याचं काम करण्यात येणार आहे. तर खोपोली एक्झीटजवळ कि.मी 39/800 वर ग्रॅन्टी उभारण्याचं काम करण्यात येणार आहे.
वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता : ब्लॉकच्या दिवशी दुपारी 12 ते 1 या वेळेत वाहतूक पूर्णपणे थांबविण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांना पुढील काही दिवस एक तास अडथळा येणार आहे. त्यामुळे या महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. सोमवारी जारी केलेल्या एका प्रसिद्धीपत्रकात 'एमएसआरडीसी'ने सांगितलं की, महामार्ग व्यवस्थापन प्रणालीचा एक भाग म्हणून 95-किमी-लांब द्रुतगती मार्गावर विविध ठिकाणी ग्रॅन्ट्री बसवल्यामुळं हा वाहतूक रोडब्लॉक घेण्यात येणार आहे.