पुणे - कोरोनाच्या या महामारीत गेल्या दीड वर्षांपासून मोठ्या प्रमाणात तृतीयपंथी बांधवांना फटका बसला आहे. त्यामुळे मुकुल माधव फाउंडेशन आणि क्रिएटिव्ह फाउंडेशनच्यावतीने तृतीयपंथीयांना किराणा आणि कोरोना किट, मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याहस्ते करण्यात आले.
येणाऱ्या काळात तृतीयपंथीयांचे प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न करू - महापौर
कोरोनाच्या या काळात सुरुवातीला अनेकांनी तृतीयपंथीयांना मदत केली त्यानंतर मधल्या काळात कोणीही मदत केली नाही. त्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले आहे. ही बाब लक्षात घेता या दोन्ही संस्थांच्यावतीने काही तृतीयपंथी बांधवांना मदतीचा हात पुढे करत किराणा आणि कोरोना किटचे वाटप करण्यात आले. आज आपण पाहतोय की कोरोनामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विसकळीत झाले आहे. शहरातील तृतीयपंथीयांच्यादेखील उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणून यासंस्थाच्यावतीने या बांधवांना मदत करण्यात येत आहे. लॉकडाऊनच्या या काळात अनेकांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. अशा या संकट काळात समाजातील महत्त्वाच्या घटकाला मदत करणे महत्त्वाचे आहे. या समाजाचे अनेक प्रश्न आहे. यापुढे या समाजाच्या ज्या काही अडचणी असतील ते सोडवण्यासाठी आम्ही काम करू आणि त्यांच्या समस्या सोडवण्याचा निश्चित प्रयत्न करू, असे मत यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले.