बारामती - कोरोनासारख्या आपत्तीसोबत लढणाऱ्या महावितरण परिमंडळाला 'तौक्ते चक्रीवादळा'चा तडाखा बसला आहे. चक्रीवादळाने बारामती परिमंडळात महावितरणचे ४८ उपकेंद्र बाधित झाले असून, घरगुती आणि औद्योगिकसह ३ लाख ४२ हजार ३८५ ग्राहकांचा वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. मात्र, नैसर्गिक आपत्तीशी दोन हात करणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांनी काही तासांतच ४४ उपकेंद्र व ३ लाख ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत केला आहे. तर, कोविड रुग्णालये, कोविड केअर सेंटर्स, ऑक्सिजन निर्मिती केंद्र यांच्या अखंडीत वीजपुरवठ्यासाठी सर्व वीज यंत्रणा २४ तास कार्यरत आहे.
विभागीय पातळीपर्यंत नियंत्रण कक्ष स्थापन
ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी चक्रीवादळाशी संबंधित परिमंडळांना या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी पूर्वकल्पना देऊन विभागीय पातळीपर्यंत नियंत्रण कक्ष स्थापन करून, सर्व कक्ष मुख्यालयाच्या नियंत्रण कक्षाशी कायम संपर्कात राहून आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत.
बारामती परिमंडळात ५४७ विजेचे खांब कोसळले
पुणे, सोलापूर आणि सातारा जिल्ह्यात, चक्रीवादळ येण्यापूर्वीच वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने वीज यंत्रणेला मोठा तडाखा दिला. बारामती परिमंडळात रविवारी दुपारपर्यंत मिळालेल्या महितीनुसार ५४७ विजेचे खांब कोसळले. तर, १८७७३ रोहित्र बंद पडल्याने ८७९ गावांतील वीजपुरवठा खंडित झाला होता. मात्र, वीज कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेऊन १५३१९ रोहित्रांचा वीजपुरवठा पर्यायी मार्गाने पूर्ववत करून, बाधितांपैकी ७९७ गावातील वीजपुरवठा पुर्ववत केला. तर, उर्वरित गावामधीलही बहुतांश वीजपुरवठा वेगवेळ्या मार्गाने सुरू करण्यात येत आहे.
वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी दिल्या सूचना
वीजपुरवठा पूर्ववत करताना कोविड हॉस्पिटल, कोविड केअर सेंटर्स, ऑक्सिजन प्लांन्टसह इतर सर्व रुग्णालये, लसीकरण केंद्रे, मोबाइल मनोरे, पाणी पुरवठा, रेल्वेसह सर्व अत्यावश्यक सेवा यांचा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरण प्रयत्नशील आहे. संचालक संजय ताकसांडे व प्रभारी प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांच्या निर्देशानुसार मुख्य अभियंता सुनील पावडे यांनी सर्व संबंधित विभागांना, वादळानंतर पर्यायी मार्गाने तातडीने वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी साहित्य व मनुष्यबळ तयार ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार सर्व वीजपुरवठा कमीत कमी वेळेत सुरळीत करण्यासाठी महावितरण यंत्रणा काम करत आहे.
हेही वाचा -कोरोना पार्श्वभूमीवर गोव्यात २१ खासगी रुग्णालये सरकारने घेतली ताब्यात