प्रतिक्रिया देताना खासदार सुप्रिया सुळे पुणे:दिव्यांग बांधवाना एडीआयपी योजनेअंतर्गत आणि वयोश्री योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यभूत अवयव तातडीने उपलब्ध व्हावेत, याकरीता राष्ट्रवादीच्या वतीने गेले अनेक महिने केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जात आहे. वारंवार मागणी करूनही याबाबत निर्णय होत नाही. ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांगांना काहीच मदत केली जात नाही. याबाबत केंद्र सरकारपर्यंत आवाज पोहचवण्याकरीता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यलयासमोर खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले आहे.
केंद्राच्या योजना जिल्ह्यात यशस्वी : केंद्र सरकारच्या दोन स्कीम आहेत. एक स्कीम दिव्यांगांसाठी आहे. दुसरी स्कीम ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे. या दोन्ही स्कीमची अंमलबजावणी मागच्या वेळी मी माझ्या मतदार संघात यशस्वीपणे केली होती. देशात बारामती मतदार संघ या स्कीममध्ये एक नंबरला आला होता. अनेक केंद्राच्या योजना जिल्ह्यात यशस्वीपणे राबविण्यात आल्या होत्या. गेल्या दीड ते दोन वर्षापूर्वी दिव्यांगांचा मोठा कॅम्प तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली झाला होता. आज दोन वर्ष होत आली, तरी अजूनही दिव्यांगांचा निधी अजूनही पोहचलेला नाही.
मागण्या मान्य झाल्या नाही, तर कोर्टात जाणार : मी हा प्रश्न अधिवेशनात मांडला आहे. मंत्री महोदय यांच्याशी चर्चा केली आहे. मंत्री संवेदनाशील आहेत. पण आम्हाला दिव्यांगांचे साहित्य मिळत नाही, म्हणून आज आंदोलन करण्यात येत आहे. जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही, तर येत्या 3 ते 4 दिवसात आम्ही याबाबत कोर्टात देखील जावू. आज वंचित बहुजन आघाडी तर्फे खडकवासला मतदार संघात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावर सुळे म्हणाल्या की, प्रकाश आंबेडकर यांची सभा होत आहे, हे चांगले आहे. संविधानामध्ये सगळ्यांना अधिकार दिलेला आहे.
कायदे फक्त विरोधकांसाठी :कसबा पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. काल भाजपकडून आचारसंहिता भंग करण्यात आली आहे. यावर सुप्रिया सुळे यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, मला आश्चर्य वाटत नाही. कारण हे सरकार नियमाने चालत नाही. कायदे फक्त विरोधकांसाठी आहेत. गुन्हा दाखल करण्याची मागणी पक्ष करेल. केंद्र सरकारकडून बजेट सादर केले जाणार आहे. याबाबत सुळे म्हणाल्या की, आमची अपेक्षा आहे की बजेटमध्ये महागाई आणि बेरोजगारी यावर ठोस उपाय केले गेले पाहिजे. हे या सरकारचे शेवटचे मोठे बजेट आहे. महागाई आणि बेरोजगारीवर काहीतरी मोठे पाऊल उचलले पाहिजे, असे देखील यावेळी सुळे म्हणाल्या.
हेही वाचा: CM Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांनी बोलावली सह्याद्रीवर आज सर्वपक्षीय खासदारांची बैठक; होणार संसदीय अधिवशेनावर चर्चा