बारामती -आरोप-प्रत्यारोपांच्या माध्यमातून देशातील अनेक महत्वाच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. या गदारोळमध्ये राज्यातील विरोधीपक्ष आणि केंद्रातील सत्ताधारी महागाईपासून लपत आहेत. पेन ड्राइव्हचे राजकारण ( Pendrive Politics ) हे सुसंस्कृत महाराष्ट्राच्या राजकारणाला न शोभणारे आहे. मात्र महागाईच्या संकटातून जनतेला कसा दिलासा दिला जाईल? याबाबत काम करणे जास्त महत्त्वाचे आहे, असे टीकात्मक मत खासदार सुप्रिया सुळे ( MP Supriya Sule ) यांनी व्यक्त केले. त्या बारामतीत बोलत होत्या.
'सुडाचे राजकारण या देशात कधीही नव्हते':कोणीही आयुष्यभर सत्तेत नसते. सत्तेच्या माध्यमातून आपल्या विरोधकालाही कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, असा निर्णय कोणीही घेऊ नये. केंद्रीय तपास यंत्रणांचा ज्या पद्धतीने गैरवापर होतो आहे. याबाबत मी गृहमंत्री अमित शहा व अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याशी चर्चा केली. याबाबत निर्मला सीतारामन यांनी संसदेमध्ये माझ्या प्रश्नाला उत्तर देखील दिले. सुडाचे राजकारण या देशात कधीही नव्हते. मात्र दुर्दैवाने असे चित्र अलीकडे दिसू लागले आहे. सध्या कोविडमधून आपण बाहेर पडत आहोत. महागाई, बेरोजगारी असे अनेक मोठे प्रश्न आपल्यासमोर आहेत. देश कसा पुढे जाईल हे आता पाहणे खूप गरजेचे आहे. राजकारण काय होतच राहिल. निवडणुका आल्यानंतर ते पाहू, असेही सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.